औरंगाबाद - "मी कमिशनर महाजन बोलतोय, अरे बाबा इकडे प्रेस काॅन्फरन्स सुरू झाली ना, तुमच्या झोनची आकडेवारी कधी देता? सांगा मला मी लिहून घेतो' ही अवस्था होती मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांची. मनपाच्या निवडणूक विभागाचा माध्यम कक्ष विस्कळीत झाल्याने माध्यमांना तर सोडा, खुद्द आयुक्तांनाच माहिती मिळणे दुरापास्त झाल्याचे गुरुवारी पाहायला मिळाले.
महापालिका निवडणुकीच्या प्रशासकीय घडामोडींची माहिती माध्यमांना त्यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत तातडीने पोहोचवण्यासाठी माध्यम कक्ष तातडीने सुरू करावा, असे निर्देश असूनही मनपाने तो कार्यान्वित केला नाही. किती जणांचे उमेदवारी अर्ज आले हे माध्यमांना कळवायला या कक्षाने २४ तास घेतले, तर बुधवारच्या छाननीनंतर नेमके किती अर्ज बाद झाले किती उरले हे जाहीर करण्यासाठी चक्क गुरुवारची रात्र उलटली.
आज दुपारी मनपा आयुक्त प्रकाश महाजन, या निवडणुकीसाठी नेमलेले चार निरीक्षक विजयकुमार फड, किशन लवांडे, वर्षा ठाकूर, जितेंद्र पापळकर, सहायक आयुक्त रमेश पवार उपायुक्त किशोर बोर्डे यांनी एक पत्रकार परिषद बोलावली होती. त्यात ही आकडेवारीही मिळू शकली नाही. अखेर सायंकाळी सविस्तर प्रेस नोट पाठवू, असे सांगण्यात आले.
या पत्रपरिषदेतच एका निवडणूक केंद्रात अजूनही छाननीचे काम सुरू असल्याचे कळल्यावर आयुक्त थक्कच झाले. त्यांनी तेथील अधिकाऱ्यांना स्वत: फोन लावला. आकडेवारी मिळवण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना त्यात यश आले नाही.
बादचे प्रमाण तुलनेने कमी
मनपानिवडणुकीसाठी आलेल्या २२४६ अर्जांच्या छाननीनंतर बाद झालेल्या अर्जांची संख्या तुलनेने कमी असल्याचे समोर आले आहे. ज्यांचे अर्ज बाद झाले त्यात अपत्यांची संख्या अधिक असणे, सूचक अनुमोदकाचे नाव मतदार यादीत सापडणे, शपथपत्र घोषणापत्र जोडलेले नसणे काही ठिकाणी सह्या नसणे अशी विविध कारणे नमूद करण्यात आली आहेत. पहाडसिंगपुरा वाॅर्डात महेंद्र रगडे, मंगेश होर्शिळ, नितीन गायकवाड यांचे अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयाने अपात्र ठरवलेल्यांच्या यादीत नाव असल्याने बाद ठरवण्यात आले. दहा निवडणूक कार्यालयांपैकी सहा कार्यालयांची आकडेवारी रात्री दहा वाजेपर्यंत उपलब्ध झाली होती, त्यानुसार ८७ जणांचे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले होते.
माघारीचा ओघ सुरू
दरम्यान,बंडखोरांचे पीक आल्यानंतर त्यांना बसवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची धावाधाव सुरू झाली आहे. आज माघारीच्या पहिल्या दिवशी साईनाथ वेताळ यांनी शिवाजीनगरातून राजेंद्र जंजाळ यांच्यासाठी, अनिल बागूल ऊर्फ अण्णा यांनी विद्यानगरातून राजू वैद्य यांच्यासाठी माघार घेतली. याशिवाय रोजाबाग वाॅर्डातून कैलास मोतीराम पाटील, विजय रामराव कुलकर्णी, पहाडसिंगपुऱ्यातून सचिन भिंगारे, संदेश वाघ, विद्या काशीनाथ कोकाटे यांनी गणेशनगर वाॅर्डातून माघार घेतली.