आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Municipal Corporation Election, Shivsena And BJP Issue Solve

औरंगाबादेत युतीचे जमले, शिवसेनेचा 4 वर्षे महापौर, भाजपला एकच वर्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबाद महापालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेबरोबरच भाजपनेही उमेदवार दिल्याने पुढे काय होणार, याचे उत्तर सोमवारी रात्री बारा वाजता समोर आले. युतीच्या नेत्यांच्या बैठकीत महापौरपद चार वर्षे शिवसेनेकडे तर एक वर्ष भाजपकडे देण्याचे ठरले. भाजपची एक वर्षाच्या महापौरपदावर बोळवण करण्यात आली असली तरी त्या बदल्यात पक्षाला तीन वर्षांसाठी स्थायी समितीचे सभापतिपद देण्यात आले आहे.

शिवसेना उपनेते चंद्रकांत खैरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत रात्री उशिरा झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला असून खैरे यांनी त्याला दुजोरा दिला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिले दीड वर्ष शिवसेनेकडे महापौरपद राहील. उर्वरित एक वर्ष हे पद भाजपकडे जाईल. शेवटची अडीच वर्षे पुन्हा शिवसेनेकडे महापौरपद राहील. शिवसेनेला चार वर्षे महापौरपद देण्याच्या बदल्यात भाजपने पाचपैकी तीन वर्षे स्थायी समितीचे सभापतिपद घेतले आहे.
त्यातील पहिले वर्ष कोणाकडे राहील हे नंतर ठरेल. म्हणजेच पहिले महापौर होण्याच्या दिशेने निघालेले शिवसेनेचे त्र्यंबक तुपे दीड वर्षेच या पदावर राहणार आहेत.

प्रसंगी एमआयएमशी घरोपा करू....
दरम्यान, औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेचे जास्त नगरसेवक निवडून आले असतानाही भाजपने महापौरपदासाठी अर्ज दाखल करून सत्तेसाठी किती हपापले आहोत हे दाखवत नैतिकता गमावली, असा आरोप शिवसेनेच्या एका वरिष्ठ मंत्र्याने केला. एवढेच नाही तर भाजपने साथ न दिल्यास अपक्ष, बंडखोर, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि एमआयएमच्या मदतीने हे पद मिळवण्याची आमची तयारी असल्याचेही या मंत्र्याने म्हटले आहे.
महापालिकेत शिवसेनेला 29, तर भाजपला 22 जागा मिळाल्या. गेल्या वेळी शिवसेनेसाठी स्थायी समिती सभापतिपद सोडलेले असतानाही भाजपने दगा देऊन राजू शिंदे यांना निवडून आणले होते. त्याच शिंदेंना भाजपने महापौरपदाची उमेदवारी दिली. शिवसेनेचे त्र्यंबक तुपे उमेदवार आहेत. महापौरपद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यावे, असा सूर भाजपने काढला होता. मात्र, शिवसेना एक वर्ष देण्यास तयार होती, असे समजते. संख्याबळ जास्त असते तर भाजपने आम्हाला महापौरपद दिले असते का, असा सवाल या मंत्र्याने केला.
मंगळवारी पुन्हा चर्चेसाठी बैठक असून तोडगा न निघाल्यास भाजप स्वबळ अजमावण्याच्या तयारीत असल्याचे पक्षाच्या नेत्याने म्हटले.
दुसरीकडे, भाजपची बंडखोर, अपक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी व एमआयएमच्या मदतीने ४०चे संख्याबळ गाठण्याची योजना आहे. स्वबळावर महापौरपद मिळवण्याची तयारी असून, माजी आमदार किशनचंद तनवाणींवर ही जबाबदारी असल्याची माहिती मिळाली होती.