आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Municipal Corporation Elections: Now 90 Percent New Faces

मनपा निवडणूक: आता ९० टक्के नवे चेहरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: सोडतीदरम्यान उत्सुकतेपोटी सभागृहात काही पदाधिकारी बसले होते. डावीकडून रवी कावडे, सभापती विजय वाघचौरे, किशोर नागरे, उपमहापौर संजय जोशी, सुशील खेडकर, गजानन बारवाल, अनिल जैस्वाल. छाया : मनोज पराती
औरंगाबाद - आरक्षणाच्या तडाख्यामुळे सर्वच पक्षांचे दिग्गज बाजूला फेकले गेले असून नव्या महापालिकेत यामुळे ९० टक्के नवीन चेहरे पाहायला मिळतील, अशी चिन्हे आहेत. यंदादेखील मैदानात उतरण्याच्या तयारीला लागलेल्या जुन्या जाणत्यांना एक तर नवीन वॉर्ड शोधावा लागेल किंवा मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे लागणार आहे.
औरंगाबाद महापालिकेच्या वॉर्ड आरक्षणाची सोडत शनिवारी काढण्यात आली. या सोडतीने शहराचे राजकारण पुरते बदलून टाकले आहे. ‘पूरे घर के बदल डालूंगा'च्या धर्तीवर बहुतेक बड्या नेत्यांना वॉर्ड गमवावे लागले आहेत. यामुळे सर्व राजकीय पक्षांचे मनसुबे उधळले गेले असून त्यांना आता नव्याने रणनीती करावी लागणार आहे. सत्ताधारी शिवसेना व भाजपला तर फटका बसलाच; पण काँग्रेस व राष्ट्रवादीचे मातब्बर नेतेही अडचणीत आले आहेत.

नव्या आरक्षणामुळे पारंपरिक गड बनवून वावरणा-या नेत्यांना आता आपापल्या वॉर्डात नवीन चेह-यांना संधी द्यावी लागणार आहे. काही मोजक्या नगरसेवकांनाच इतरत्र सामावून घेता येणार असल्याने बहुतेक जणांना शांत बसावे लागणार आहे अथवा पक्षकार्याला वाहून घ्यावे लागणार आहे. परिणामी येणा-या महापालिका निवडणुकीत सुमारे ९० टक्के चेहरे नवीन असणार आहेत.
संधी कमीच
ज्या मातब्बरांना वॉर्ड गेल्याने अडचण निर्माण झाली आहे त्यांना १४ वॉर्ड वाढूनही संधीची शाश्वती नाही. परिणामी ११३ मध्ये मोजकेच अनुभवी नगरसेवक येण्याची शक्यता आहे.

महिलांची संख्या वाढणार
अनुसूचित जाती, ओबीसी व सर्वसाधारण या तिन्ही श्रेणींत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याच्या धोरणामुळे महिला उमेदवार शोधताना पक्षांची दमछाक होणार आहे. या वेळी प्रथमच ११३ पैकी ५७ महिला असणार आहेत. पुरुषांचे संख्याबळ एकने कमी होणार असून सत्तेचे समीकरणही बदलणार आहे.

इच्छुकांना आशा
बड्या नेत्यांमुळे संधी मिळत नसलेल्या इच्छुकांना वर्षानुवर्षे सतरंज्या उचलायचे काम करावे लागत होते. आरक्षणामुळे आता अनेक ठिकाणी नाइलाजाने का होईना पक्षांना नवीन चेह-यांना संधी द्यावी लागणार असल्याने इच्छुकांच्या आशा उंचावल्या.

पक्षांना बदलावे लागेल धोरण
आतापर्यंत विद्यमान नगरसेवकांना संधी व नवीन चेह-यांना संधी अशी ढोबळ रणनीती राजकीय पक्षांनी आखली होती; पण आता सारीच उलथापालथ झाल्याने जुन्यांना अॅडजस्ट करून नव्या चेह-याचा शोध घ्यावा लागणार आहे. सर्वात अडचण शिवसेना भाजपची झाली असून मनपा चालवणारे जवळपास सगळेच सूत्रधार आरक्षण सोडतीमुळे संकटात आले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने ज्येष्ठ व अनुभवींना कोठे सामावून घ्यायचे हा मोठा पेच निर्माण झाला आहे.

किल्ले गेलेले मातब्बर
शिवसेनेचे सभागृह नेते किशोर नागरे, गटनेते गजानन बारवाल, स्थायी समिती सभापती विजय वाघचौरे, राजू वैद्य, गिरजाराम हाळनोर, सुशील खेडकर, विकास जैन, त्र्यंबक तुपे या मातब्बर नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षणात अडकले. विधानसभेच्या यशाने उत्साह वाढलेल्या भाजपच्या तंबूतही आरक्षणामुळे गडबड उडाली आहे. उपमहापौर संजय जोशी किमान चार वॉर्डांवर नजर ठेवून होते. ते सगळे वॉर्ड हातातून गेले. संजय केणेकर, महेश माळवतकर, बालाजी मुंडे, हुशारसिंह चव्हाण, जगदीश सिद्ध, सुरेंद्र कुलकर्णी, अनिल मकरिये, संजय चौधरी यांचेही वॉर्ड हातून गेले. काँग्रेसचे प्रमोद राठोड, मीर हिदायत अली, असद पटेल, रावसाहेब गायकवाड यांचे वॉर्ड राखीव झाले. राष्ट्रवादीचे काशीनाथ कोकाटे यांनाही वॉर्ड राहिला नाही. अफसर खान, अपक्ष नगरसेवक समीर राजूरकर यांचीही तीच अवस्था झाली आहे.