आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Municipal Corporation Electricity Issue

उधळपट्टी: सात कोटींचे बिल थकले तरीही मनपात भरदिवसा उजेड !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महापालिकेकडे मागील पाच महिन्यांपासून जीटीएलचे वीज बिलापोटी सात कोटी रुपये थकले असतानासुद्धा पदाधिकारी आणि प्रशासन यापैकी कुणाच्याही डोक्यात ‘प्रकाश’ पडलेला दिसत नाही. उलट पालिका कार्यालयातील विविध दालनांत भरदिवसा दिव्यांचा झगमगाट सुरूच आहे. दिवे आणि इतर उपकरणे सुरूच ठेवून पदाधिकारी-अधिकारी कार्यालयाबाहेर जात असल्याने विजेची नासाडी होत असल्याचा प्रत्यय आज ( 5 मार्च ) ‘दिव्य मराठी’ला आला.

दै. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने मंगळवारी पालिकेच्या मुख्यालयातील विविध दालनांची पाहणी केली. त्या वेळी विजेचे दिवे आणि उपकरणे सुरू ठेवून पदाधिकारी व कर्मचारी कार्यालयात नसल्याचे निदर्शनास आले. महापौर कला ओझा, उपमहापौर संजय जोशी, शिवसेनेचे गटनेते गिरजाराम हाळनोर यांच्यासह विषय समित्यांचे सभापती व अधिकार्‍यांच्या दालनात भरदिवसा लख्ख प्रकाश पडला होता. विद्युत विभागाचे उपअभियंता पी.आर. बनसोड यांच्या दालनात तर ट्यूबलाइट, दोन फॅन सुरू होते. आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या दालनाबाहेर कुणीही उपस्थित नसताना पंखा, शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानदा कुलकर्णी यांच्या केबिनमध्ये संगणक आणि ट्यूबलाइट सुरू होते.

ग्राहकाचे नाव कधीपासून थकीत रक्कम
>सहायक आयुक्त जानेवारी 2013 9 लाख 90 हजार 750
>एन-5 कार्यालय जानेवारी 7 लाख 5 हजार 580
>ललित भवन डिसेंबर 2012 2 लाख 23 हजार 330
>सिद्धार्थ तलाव डिसेंबर 8 लाख 16 हजार 780
>उद्योग भवन सिडको डिसेंबर 7 लाख 44 हजार 70
>आयुक्त ऑगस्ट 2012 6 लाख 47 हजार 690
>टाऊन हॉल डिसेंबर 7 लाख 470 रुपये
>सलीम अली सरोवर नोव्हेंबर 1 लाख 30 हजार 550
>आयुक्त डिसेंबर 51 लाख 38 हजार 140
>मुख्य अभियंता, शहागंज जानेवारी 9 लाख 61 हजार 620
>नक्षत्रवाडी डिसेंबर 14 लाख 98 हजार 600

पाऊस कमी झाल्याने परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्र बंद पडले. वीजनिर्मितीसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे, तर दुसरीकडे विजेची गळती आणि अपव्यय मोठय़ा प्रमाणावर होत आहे. ग्रामीण भागात आठ तासांपेक्षा अधिक भारनियमन करून पुरवठा आणि मागणीचा समतोल राखला जात आहे; परंतु महापालिकेत मात्र विजेचा सर्रास अपव्यय होताना दिसतो.