आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रेट औरंगाबाद पॉलिटिकल थिएटर: भाजपने रचले नाट्य, तिसराच कलाकार घुसल्याने विस्कोट!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महत्त्वाचे प्रस्ताव असले की भावनिक मुद्द्यांवर नेहमीच असा राडा घडवून आणला जातो. - Divya Marathi
महत्त्वाचे प्रस्ताव असले की भावनिक मुद्द्यांवर नेहमीच असा राडा घडवून आणला जातो.
औरंगाबाद- गैरव्यवहारामुळे निलंबित तीन अधिकाऱ्यांना कामावर आम्हाला विश्वासात घेता कामावर रुजू का करून घेतले, असा जाब शिवसेनेकडून शनिवारच्या (१९ आॅगस्ट) सर्वसाधारण सभेत विचारला जाणार होता. त्यांना तशी संधी मिळूच नये, यासाठी ‘वंदे मातरम’वरून महानाट्य घडवून आणण्याचे आधीच ठरले होते. आधी सभा तहकूब करायची आणि प्रकरण शांत झाल्यावर पुन्हा सुरू करावी, अशी पटकथा शुक्रवारी रचली गेली. त्यात कोणी काय भूमिका वठवायची, हेही निश्चित झाले होेते. तसेच नाट्य पहिले काही मिनिटे झालेही. परंतु, या नाट्याची पूर्वकल्पना नसलेला एकजण मध्येच घुसला आणि प्रकरण पटकथेत ठरल्याप्रमाणे गदारोळाएेवजी गुद्दागुद्दीपर्यंत पोहोचले. नगरसेवकांचे निलंबन पोलिसांत तक्रार देण्याची वेळ भाजपवर आली. अर्थात भावनिक मुद्यावर सभा तहकुबीची गेल्या ३० वर्षांतील परंपरा कायम राहिली. 

१९८८ पासून मनपाच्या सर्वसाधारण सभा, स्थायी समिती बैठकीची सुरुवात ‘वंदे मातरम’नेच होते. त्यावरून कधी वाद झाला नाही. एमआयएमचे सदस्य गेली अडीच वर्षे उभे राहून या गीताचा सन्मान करतात. शनिवारी जे सय्यद मतीन वंदेमातरम गीताच्यावेळी बसून तेच मतीन गेल्या आठवड्यात स्थायीच्या बैठकीत या गीताच्या वेळी उभे होते. त्यामुळे ते शनिवारी का उभे राहिले नाही. त्यांच्याच पक्षाचे इतर नगरसेवक का बसून राहिले नाही. मतीन यांना काँग्रेसच्या सोहेेल शेख यांनी का साथ दिली. गजानन बारवाल, नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे, अफसर खान, एमआयएमचेच सोहेल शकील ही मंडळी वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असताना युतीच्या गटाला मागून का रेटले जात होते? वंदे मातरमला विरोध ही आमची भूमिका नाही, असे म्हणत मतीन यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे आमदार इम्तियाज जलील यांनी का सांगितले. या प्रश्नाच्या उत्तरात नाट्य घडवल्याचे स्पष्ट होते. 

नेमका घटनाक्रम असा... 
>नियोजित ११.३० ची सभा १२ वाजता सुरू झाली. ‘वंदे मातरम’ने सभेला सुरुवात होईल, असे महापौर भगवान घडमोडे म्हणाले. गीताची कॅसेट वाजू लागली तेव्हा एमआयएमचे सय्यद मतीन काँग्रेसचे सोहेल शेख हे बसून होते. गीत संपताच शिवसेनेचे रावसाहेब आमले यांनी त्यांचा बसलेला फोटो काढला आणि कारवाईची मागणी केली. शिवसेनेचे राजू वैद्य, नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे, भाजपचे प्रमोद राठोड, राजू शिंदे, किशोर थोरात यांच्यासह सत्ताधारी महिलाही आक्रमक झाल्या. ‘वंदे मातरम’च्या घोषणा त्यांनी सुरू केल्या. त्याला एमआयएमने ‘हिंदुस्तान जिंदाबाद’ च्या घोषणांनी प्रत्युत्तर दिले. ‘वंदे मातरम’चा अवमान करणाऱ्यांनी बाहेर जावे, असे महापौरांनी जाहीर केले. मात्र आम्ही बाहेर जाणार नाहीत, अशी भूमिका एमआयएमने घेतली. त्यामुळे १२ वाजून मिनिटांनी सभा तहकूब करण्यात आली. 
 
>त्यानंतर एमआयएम, शिवसेना भाजपचे सदस्य एकमेकांशी निवांत गप्पा मारत होते. गोंधळात प्रमोद राठोड यांचे खाली पडलेले घड्याळ एका एमआयएम सदस्याने त्यांच्याकडे आणून दिले. 

> १२ वाजून १० मिनिटांनी सभा पुन्हा सुरू होताच दोन सदस्यांचे सदस्यत्व निलंबित करणाऱ्या महापौरांचे अभिनंदन, असा प्रस्ताव दिलीप थोरात यांनी ठेवला. त्यावर महापौरांचा निषेध असो, अशा घोषणा सुरू झाल्या. त्याला वंदेमातरम््चे प्रत्युत्तर मिळाले. एमआयएमच्या सबिना शेख यांनी ‘सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा’ गीत म्हटले. १२ वाजून २० मिनिटांनी पुन्हा सभा तहकूब झाली. 

>महापौर मिनी चेंबरमध्ये गेले. सभागृहात घोषणाबाजी सुरूच राहिली. काही क्षणात सत्ताधारी, विरोधकांत रेटारेटी सुरू झाली. 

>मतीन यांनी माइकचा दांडा हाती घेतला, तर शेख जफर फॅन उचलून वार करण्यासाठी निघाले. प्रत्युत्तरासाठी युतीचे सदस्यही सज्ज होतेच. पुन्हा लोटालोटी झाली. यात राठोड यांना जफर यांनी धक्काबुक्की केली. काँग्रेसचे अफसर खान यांनी जफर यांना खेचून मागे नेले.

>प्रकरण मिटत आले असतानाच जफर यांनी शिवी दिली अन् राठोड राजू शिंदे, कचरू घोडके, गजानन मनगटे त्यांच्यावर धावून गेली. पण त्यांना काहींनी रोखले. एमआयएम सदस्यांनी त्यांना सभागृहाबाहेर नेले. 

> तोपर्यंत पोलिस पोहोचले होते. त्यांच्यासमोर ‘इस देश में रहेना होगा तो वंदे मातरम कहेना होगा’, ‘जो हिंदुत्व की बात करेगा, वही देशपे राज करेगा,’ ‘पाकिस्तान मुर्दाबाद,’ अशा घोषणा झाल्या. युतीच्या नगरसेविका नृत्य करत घोषणा देत होत्या. प्रचंड घोषणाबाजीनंतर दोन्हीही बाजूंचे सदस्य थकून काहीसे शांत झाले. 

> 1 वाजून २० मिनिटांनी सभा सुरू झाल्यावर महिला सदस्यांनी सभागृहात भारतमातेची प्रतिमा आणून ती याच सभागृहात लावावी, अशी मागणी त्यांनी केली. 

> मग माइकची मोडतोड करणाऱ्यांविरोधात गुन्हे नोंदवा अशी मागणी करत वंदे मातरम म्हणावेच लागेल, असे गजानन बारवाल, िशंदे म्हणू लागले. त्याला एमआयएमकडून पुन्हा प्रत्युत्तर मिळाले. 

>महापौरांनीतिघांचे सदस्यत्व एक दिवसासाठी रद्द करून दोघांविरोधात गुन्हा नोंदवून त्याचा अहवाल शासनाकडे देण्याचे आदेश दिले. काही जणांचा शहरातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणत वाजून २७ मिनिटांनी सभा तहकूबीची घोषणा केली. 

आत नाटक, बाहेर तणाव 
तास २७ मिनिटांच्या वेळेत सभेत जोरदार घोषणाबाजी झाली. सदस्य एकमेकांवर धावून गेले. नंतर ही मंडळी एकमेकांशी मित्रांप्रमाणे हास्यविनोद करत होती. परंतु वाद झाल्याची बातमी बाहेर गेली तेव्हा मात्र दंगलच भडकल्याचे चित्र दिसले. मनपा आवारात सेना, एमआयएम समर्थक मोठ्या संख्येने होते. शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे, भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, आ. अतुल सावे हे मनपात आले. एमआयएम समर्थकांनी दिलीप थोरात यांची मोटार अडवली होती. त्यांनी मतीन यांना खांद्यावर उचलून आमदार जलील यांच्या कार्यालयात नेले. 

अशीच होते ठरवून तहकुबी 
महत्त्वाचे प्रस्ताव असताना भावनिक मुद्दे काढून सभा तहकुबीचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले. २००७ मध्ये समांतरचा मूळ प्रस्ताव, रॅम्कीला सफाईचे काम देतानाही गदारोळ करून चर्चेविना प्रस्ताव मंजूर झाला. त्यावेळी हज हाऊस, उर्दूतील विषयपत्रिका असे मुद्दे काढले होते. बहुतांश वेळा युतीच्या एखाद्या सदस्याने औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’ असा करायचा अन् त्यावरून वाद वाढवायचा असा प्रयोग नेहमी केला जातो. त्यामुळेच एमआयएम आणि भाजपमध्ये शनिवारी युतीच झाली होती असा आरोप काँग्रेस शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी केला. 
बातम्या आणखी आहेत...