आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Municipal Corporation Give Priority To Ministers

मनपाला सणांपेक्षा मंत्र्यांचीच जास्त चिंता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दरवर्षी सणासुदीच्या काळात साफसफाईला प्राधान्य दिले जाते. तसे ते यंदाही देण्यात येत असले, तरी या वेळी मनपाला सणांपेक्षा ज्या रस्त्याने मंत्र्यांची ये-जा होणार त्याच रस्त्यांची चिंता असल्याचे स्पष्ट झाले आहे. ईदनिमित्त शुक्रवारी शहरात दिवसभर सफाई तसेच कचरा वाहतूक केली जाईल. त्यानंतर गणेश विसर्जनाच्या दिवशीही दिवसभर हेच काम सुरू राहील. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठक होईपर्यंत शहरातील पाच प्रमुख रस्त्यांवर मात्र दररोज झाडलोट केली जाणार आहे.

बकरी ईद, गणेशोत्सव मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील साफसफाई तसे विद्युत व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी महापौर त्र्यंबक तुपे यांच्या अध्यक्षतेखाली महापौरांच्या दालनात गुरुवारी सकाळी बैठक घेण्यात आली. उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात, उपायुक्त रवींद्र निकम अय्युब खान यांच्यासह सर्व वॉर्ड अधिकारी, अभियंते उपस्थित होते.

या बैठकीचा सूरच मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान शहर स्वच्छ कसे दिसेल, यासाठी काय करावे, असा होता. त्यामुळे एक दिवस बकरी ईदसाठी, तर गणेशोत्सवासाठी दोन दिवसांचे नियोजन करण्यात आले. मात्र, मंत्रिमंडळ बैठक होईपर्यंत शहरातील पाच प्रमुख रस्त्यांवर स्विपिंग यंत्राद्वारे दररोज सफाई करण्याचे ठरवण्यात आले. त्याचबरोबर शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुभाजकावरील गवत, माती तातडीने काढावी, तेथील पथदिवे सुरू करण्यात यावे, असे आदेश या वेळी देण्यात आले. गणपती विसर्जनाच्या दिवशी सुटी असली तरी कर्मचाऱ्यांनी या दिवशी कामावर हजर राहावे, असे आदेशही जारी करण्यात आले आहेत. या दिवशी रात्री उशिरापर्यंत सफाई सुरू ठेवली जाणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीचीच चिंता, प्रत्येक वॉर्डाला निधीची तरतूद
यासाठी किती खर्च येईल, याचा अंदाज नसला तरी प्रत्येक वॉर्ड कार्यालयाला प्रत्येकी ५० हजार असे तीन लाख रुपये देण्याचेही आदेश या वेळी देण्यात आले. त्यामुळे शुक्रवारपासून सुरू होणारी साफसफाई थेट मंत्रिमंडळ बैठकीपर्यंत चालणार आहे. त्याचबरोबर या रस्त्यांवरील पथदिवे, काही खांबही बदलावे लागणार असल्याने ते कामही हाती घेतले जाणार आहे. एकूणच पालिका प्रशासन मंत्रिमंडळ बैठकीचीच चिंता वाहत असल्याचे यावरून दिसून येते. मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान शहरात स्वच्छता राहावी, हा प्रयत्न नक्कीच आहे, परंतु बकरी ईद तसेच गणेशोत्सवातील साफसफाईकडे अजिबात दुर्लक्ष नाही, असे महापौर त्र्यंबक तुपे यांनी म्हटले आहे.