आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समांतर योजना बारगळणार; वर्ष उलटून गेले तरी ठेकेदाराशी अजूनही करार नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- तहानलेल्या औरंगाबादकरांना मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी मनपा, राज्य आणि केंद्र सरकारने हाती घेतलेली समांतर जलवाहिनीची योजना बारगळण्याच्या मार्गावर आहे. खासदार चंद्रकांत खैरे वगळता अन्य सर्वच लोकप्रतिनिधींनी या योजनेच्या भवितव्याविषयी गेल्या महिनाभरात साशंकता व्यक्त केली आहे. सोमवारी (चार मार्च) मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनीही योजना सुरू करण्याची निश्चित तारीख सांगण्यास असर्मथता दर्शवली. यापूर्वी त्यांनी 31 मार्च रोजी काम सुरू होईल, असे वक्तव्य केले होते. मात्र, आज त्यांनी 30 मार्चपर्यंत योजनेचे नेमके काय करायचे, याविषयी निर्णय घेऊ असे स्पष्ट केले.

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या 700 आणि 1400 मिलिमीटरच्या जलवाहिन्यांचे आयुष्य संपत असल्याचे 2000 मध्ये पाणीपुरवठा विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे 2025 पर्यंत 325 एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिवस) पाणी आणू शकणारी योजना तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. आधी खासगीकरणातून हे काम करण्याचे ठरले होते. मात्र, ऑक्टोबर 2006 मध्ये केंद्र सरकारच्या निधीतून योजना पूर्ण करण्याचे ठरले. केंद्राने 144 कोटींचा पहिला टप्पाही 2010 मध्ये मनपाच्या तिजोरीत जमा केला. त्यानंतर 2381 कोटी 65 लाख रुपये खर्चाच्या या कामाची निविदा प्रक्रिया होऊन ठेकेदाराची निवडही झाली. त्यास वर्ष उलटून गेले असले तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही. तारखा देऊनही या योजनेचे भूमिपूजन झाले नाही.

पुढे काय ?
> विशेष सभा घेऊन कंत्राट रद्द करण्याचा निर्णय होऊ शकतो.
> नव्याने निविदा प्रक्रिया होऊ शकते.
> योजना शासनाकडे हस्तांतरित करता येऊ शकते.
> महाराष्ट्र जीवन प्राधिकरण किंवा तत्सम सरकारी यंत्रणेमार्फत 15 टक्के कार्यवाही निधी तत्त्वावर योजनेचे काम सुरू होऊ शकते.
> विद्यमान ठेकेदारासोबत तातडीने करार करून कामाला वेग देण्याच्या हालचाली होऊ शकतात.

महिनाभरापासून काय सुरू आहे
खासदार खैरे कुठल्याही परिस्थितीत ठेकेदाराकडून योजना पूर्ण केली जाणार असे सांगत आहेत. मात्र, आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, सतीश चव्हाण, किशनचंद तनवाणी, प्रशांत बंब तसेच उपमहापौर संजय जोशी यांनी याबद्दल वारंवार साशंकता व्यक्त केली आहे. ठेकेदार, प्रशासनाने या कामात अनेक त्रुटी ठेवल्या आहेत. त्यामुळे ठेकेदाराकडून हे काम होणारच नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. या सर्वांनीच कंत्राट रद्द करण्याचा सूर महिनाभरापासून लावला आहे. शनिवारी (दोन मार्च) झालेल्या जेएनएनयूआरएमच्या बैठकीत आमदारांनी समांतरवर हल्ला चढवला होता.


ठेकेदाराच्या कंपनीचे बोगस पत्ते
ठेकेदाराच्या कंपनीचे मे. एसपीएमएल. प्लॉट क्रमांक एफ 27/2, ओखला इंडस्ट्रीज एरिया, फेज 2, नवी दिल्ली, मे. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी प्रा. लि. 206, र्मकंड बिल्डिंग, कॅनरा बँकच्यावर, अँनी बेझंट मार्ग वरळी नाका, मुंबई, असे बोगस पत्ते असल्याचेही निदर्शनास आले. ही बाब उच्च् न्यायालयातही मांडण्यात आली. कंपनीची नोव्हेंबर 2012 मध्ये दहा ठिकाणी कार्यालये आहेत, असे सांगण्यात येत होते. ती सध्या बंद आहेत. कंपनीचे कार्यालय नेमके कुठे आहे, याचीही ठोस माहिती प्रशासनाकडे नाही.

तारीख पे तारीख
योजनेच्या भूमिपूजनासाठी वारंवार तारखा देण्यात आल्या. मात्र, त्यातील एकही प्रत्यक्षात आली नाही. डॉ. कांबळे यांनी सात फेब्रुवारी रोजी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी 31 मार्च रोजी समांतरच्या कामाला सुरुवात होईल, असे म्हटले होते. आज त्यांना याबद्दल विचारणा केली असता त्यांनी ठामपणे बोलणे टाळले. ठेकेदाराचे सात कोटी रुपये मनपाकडे जमा आहेत. त्याला काम करायचे नसेल तर तो ही रक्कम घेऊन जाऊ शकतो, असे ते म्हणाले. मार्चअखेरीस समांतरचे भूमिपूजन होणार काय, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले नाही.