आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळती रोखण्याच्या नावाखाली कमिशनखोरीला ऊत; 17.77 कोटींची उधळपट्टी!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गेल्या चार वर्षांत 17 कोटी 77 लाख रुपये खर्चूनही शहरातील जलवाहिन्यांची गळती कायम आहे. त्यातून दररोज लाखो लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे दुहेरी नुकसान होत आहे. पाणीटंचाईचे संकट घोंघावत असताना गळती रोखण्याच्या नावाखाली पैशाची उधळपट्टी होत असल्याचा आरोप नगरसेवक, पदाधिकार्‍यांनी केला आहे. तर जलवाहिनीच्या वापराची र्मयादा संपल्याने गळती होणारच, अशी सारवासारव अधिकार्‍यांकडून केली जात आहे.

जायकवाडी धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 1400 आणि 700 मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्या आहेत. नक्षत्रवाडी येथील जलसंतुलन तलावातून पाणी शहरात वितरित केले जाते. शहरांतर्गत असलेले जलवाहिन्यांचे जाळे जायकवाडी येथून येणार्‍या जलवाहिन्यांच्या तुलनेत नवे आहे. तरीही त्यावर मोठय़ा प्रमाणात गळती सुरू असते. त्याच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर केले जातात. तातडीची कामे या शीर्षकाखाली त्याला तत्काळ मंजुरीही दिली जाते. बिलही त्याच गतीने अदा केले जाते. तरीही गळती थांबत नाही. खर्चही कमी होत नाही.

नगरसेवक समीर राजूरकर यांनी दुरुस्तीच्या नावाखाली कमाई सुरू असल्याचा आरोप गुरुवारी स्थायीच्या बैठकीत केला. त्यातील कितपत तथ्य आहे, याची माहिती दै. दिव्य मराठीने घेतली. तेव्हा गळती कुठे, कशामुळे झाली, प्रत्येक दुरुस्तीवर किती खर्च झाला, याचे कोणतेही रेकॉर्ड मनपाकडे नसल्याचे स्पष्ट झाले.

केवळ एकत्रित रकमा नोंदवण्यावरच अधिकार्‍यांनी समाधान मानले आहे. समांतर जलवाहिनीच्या कामासाठी 25 महत्त्वपूर्ण मालमत्ता गहाण ठेवून दोनशे कोटींचे कर्ज काढण्यात आले आहे; पण मूळ उद्दिष्ट बाजूला ठेवून त्या कर्जाच्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम महावितरणची थकबाकी देण्यात खर्च करण्यात आली आहे. यामुळे समांतरचे भवितव्य अंधारात लोटले गेले आहे. दुसरीकडे शहरांतर्गत जलवाहिन्यांच्या गळती दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च करण्याचा सपाटा सुरू आहे.


चार वर्षांमध्ये वॉर्डनिहाय झालेला खर्च असा
वॉर्ड 2009-10 2010-11 2011-12 2012-डिसेंबरपर्यंत

अ> 32 लाख 75 लाख 1 कोटी 45 लाख 63 लाख

>80 लाख 93 लाख 1 कोटी 54 लाख 1 कोटी 70 लाख

> 30 लाख 58 लाख 69 लाख 42 लाख

> 40 लाख 36 लाख 58 लाख 90 लाख

> 28 लाख 46 लाख 1 कोटी 5 लाख 1 कोटी 26 लाख

> 49 लाख 43 लाख 78 लाख 70 लाख

''खर्च तर कोट्यवधी रुपयांचा होत आहे. समस्या कायम आहे. तेव्हा हे क ोट्यवधी रुपये जातात कुठे? असेच सुरू राहिले तर मनपाला उरलेल्या मालमत्ताही गहाण ठेवाव्या लागतील. सुधारणा करायची असेल तर गळती व दुरुस्तीचा संपूर्ण तपशील नोंदवला पाहिजे.''
-समीर राजूरकर, नगरसेवक

''गळती थांबवण्यासाठी चार वर्षांत 17 कोटींपेक्षा अधिक खर्च झाला आहे. यामध्ये शहर विकासाची कामे झाली असती. समांतरमुळे नवीन जलवाहिनी टाकण्यात येत नाही. जुन्या जलवाहिनीच्या दुरुस्तीवर अमाप खर्च होत आहे.''
-प्रमोद राठोड, नगरसेवक