आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंठेवारीत टँकर दरवाढीचा प्रस्ताव फेटाळला; पाण्याच्या दुप्पट दरवाढीला विरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गुंठेवारी वसाहतीत राहणार्‍या नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवायला निघालेली टँकरची दरवाढ करण्याचा प्रस्ताव नगरसेवकांच्या प्रखर विरोधानंतर मनपाच्या सर्वसाधारण सभेने फेटाळून लावला. या निर्णयामुळे तीन लाख लोकांना दिलासा मिळाला आहे.

दुष्काळ असो नसो बाराही महिने गुंठेवारी वसाहतींना मनपाकडून टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. या भागात नळ कनेक्शन नसल्याने टँकरशिवाय पर्यायच नसतो. यासाठी वर्षाला प्रतिकुटुंब 2 हजार रुपये आकारणी करण्यात येते. मात्र, टँकरवर होणारा खर्च आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न यामध्ये मोठी तफावत आहे. हा अतिरिक्त भार मनपाची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने सहन करणे शक्य नाही, असे कारण सांगत प्रशासनाने दरवाढीचा प्रस्ताव तयार करून तो सभागृहापुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता, पण सभागृह सदस्य त्र्यंबक तुपे, बालाजी मुंडे यांनी हा प्रस्ताव मंजूर करू नये, अशी भूमिका घेतली. ज्या ठिकाणी नळ कनेक्शन आहे, त्या ठिकाणावरून वर्षाला 2700 रुपये पाणीपट्टी आकारण्यात येते आणि टँकरद्वारे पाणी घेणार्‍या कुटुंबांना दोन हजार रुपये द्यावे लागतात, हे चुकीचे आहे. ही दरवाढ लागू झाली तर प्रतिकुटुंब 4500 ते 4800 रुपये भार पडेल. तो त्यांना पेलणे शक्य नसल्याचे सभागृहाच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे महापौर कला ओझा यांनी हा प्रस्तावच रद्द केल्याचे सांगितले.

सव्वातीन कोटींचा भार
गत वर्षी मनपाने पाणीपुरवठा करण्यासाठी 4 कोटी 65 लाख 92 हजार 472 रुपये खर्च केला आहे. यापैकी 1 कोटी 44 लाख 68 हजार 72 रुपये पाणीपट्टीच्या रूपात उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे मनपा फंडातून 3 कोटी 21 लाख 24 हजार 400 रुपये खर्च करावा लागला आहे. दरवाढीचा प्रस्ताव फेटाळल्यामुळे यावर्षीच्या खर्चाचा भारही पालिकेला पेलावा लागणार आहे.


118 गुंठेवारी वसाहतींची संख्या
0अंदाजपत्रकात तरतूद : 6 कोटी 4 लाख 68 हजार 480 रुपये
0 मागील तीन महिन्यांत झालेला खर्च : 2 कोटी 19 लाख 30 हजार 840 रुपये
0 मार्चपर्यंत येणारा खर्च : 8 कोटी रुपये


दुपटीने दरवाढ कशी करता ?
ज्यांच्याकडे नळ कनेक्शन आहे. ते वर्षाला 2700 रुपये पाणीपट्टी कराचा भरणा करतात. ज्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो त्यांच्याकडून साडेचार हजार रुपये आकारणी करायची ही चुकीची पद्धत आहे. ते आम्ही कदापी होऊ देणार नाही.
-बालाजी मुंडे, नगरसेवक

आता दरवाढ करणे अयोग्य
आठ महिन्यांपूर्वीच प्रशासनाने 150 रुपये दरवाढ केली आहे. त्यामुळे आता दरवाढ करणे योग्य नाही. टँकरद्वारे जो पाणीपुरवठा करण्यात येत आहे त्याचा संपूर्ण खर्च समांतरच्या ठेकेदाराकडून वसूल करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे.
-त्र्यंबक तुपे, नगरसेवक

खर्च-उत्पन्नात मोठी तफावत
पूर्वी एका कुटुंबाकडून 2 हजार रुपये वर्षाला घेत होतो, पण खर्च अधिक आणि मिळणारे उत्पन्न यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे एका टँकरला जो खर्च येतो त्याप्रमाणे दरवाढीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 4 हजार 500 ते 4 हजार 800 रुपये एका कुटुंबाला खर्च येतो.
-सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता, मनपा.