आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्रजांना हरवले, रझाकारांना नमवले, पण मनपासमोर हात टेकले..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद मुक्तिसंग्रामातील सर्वात ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रतिलाल जरिवाला (95) आणि त्यांच्या पत्नी चंदाबेन जरिवाला (91) हे कुवारफल्ली भागात राहतात. केवळ देशाभिमान अन् मायभूमीच्या प्रेमापोटी ते अमेरिकेतील मुला-नातवंडांना सोडून औरंगाबाद शहरात राहतात. 1936 पासूनचा लढा त्यांनी पाहिला. देशासाठी इंग्रज सरकारशी लढले. नंतर हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या लढय़ात दोघेही अग्रेसर होते, पण ‘इंग्रजांना हरवले, रझाकारांना नमवले, आता मात्र महापालिकेसमोर हात टेकल्याचे’ दोघेही अत्यंत दु:खाने सांगतात. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून ते कुवारफल्ली भागातील जनावरांचे गोठे हलवा, गलिच्छ गल्ल्या स्वच्छ करा, रस्ते रुंद करा.. या मागण्यांसाठी महापालिकडे सतत गार्‍हाणे मांडत आहेत; पण मनपाच्या निर्ढावलेल्या अधिकार्‍यांनी त्यांच्या अर्जांना सातत्याने केराची टोपली दाखवली.

‘इंग्रजांशी लढून त्यांना जेरीस आणले, हैदराबाद मुक्तिसंग्रामात भाग घेऊन रझाकारांना पळता भुई थोडी करून त्यांना नमवले; पण स्वातंत्र्यानंतर महापालिकेच्या हिटलरशाहीपुढे आम्ही अक्षरश: हात टेकले आहेत.’ हे उद्विग्न उद्गार आहेत शहरातील वयोवृद्ध ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जरिवाला दांपत्याचे. कुवारफल्लीतील अवैध गोठे, त्यामुळे झालेल्या अरुंद गल्ल्या आणि घाणीचे साम्राज्य आदी त्रासाविरुद्ध संघर्ष करून ते आता थकले आहेत. शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी आपली कैफियत डीबी स्टारकडे मांडली. संपूर्ण शहरात 692 गोठे असून 7 हजारांपेक्षाही जास्त जनावरे आहेत. पावसाळ्यात या गोठय़ांमुळे साथीचे आजार पसरण्याचा धोका अधिकच वाढतो.

800 विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
कुवारफल्लीसारख्या चिंचोळ्या गल्लीत पी. यू. जैन विद्यालय ही मोठी शाळा आहे. पहिली ते दहावीपर्यंत ही शाळा आहे. यात तब्बल 800 विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेच्या समोरच कचराकुंडी आहे. तसेच बाजूला घोड्याचा तबेला अन् म्हशीचा गोठाही आहे. पावसाळ्यात या गोठय़ातील घाण वाहत रस्त्यांवर येते. कचराही कायम कुजलेला असतो. या सर्व घाणीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून या विद्यार्थ्यांसाठी तरी हे गोठे हटवा, कचरा काढा, निदान स्वच्छता ठेवा, अशी रहिवाशांची मागणी आहे.

लोकशाहीतली हिटलरशाही
साधारण 1990 पासून या भागातील घाणीने व नागरी समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. त्या सर्वांच्या पाठीशी जरिवाला दांपत्य उभे राहिले. आता लोक तक्रारी करून कंटाळले, पण या दोघांनी स्वच्छतेचा लढा चालूच ठेवला आहे. ही तिसरी लढाई आम्ही लढत आहोत, असे ते नेहमी म्हणतात. अनेक स्मरणपत्रे पाठवूनही त्यांच्या वॉर्डातील नागरी समस्या मनपा अधिकार्‍यांनी दूर न केल्याने त्यांनी वैतागून मनपाच्या कारभाराला लोकशाहीतील हिटलरशाहीची उपमा 31 डिसेंबर 2008 च्या स्मरणपत्रात दिली आहे.

आरे कॉलनीसारखा प्रस्ताव
30 जानेवारी 2008 रोजी रतिलाल जरिवाला यांनी एक पत्र मनपाला दिले होते. त्या पत्राची दखल न घेतल्याने पुन्हा ते स्मरणपत्र 31 डिसेंबर 2008 रोजी पाठवले. यात त्यांनी वॉर्ड अधिकार्‍याला काही कल्पना सुचवल्या आहेत. शहरातील सर्व गोठय़ांसाठी मुंबईच्या आरे कॉलनीसारखी योजना करावी, असा प्रस्ताव त्यांनी पालिकेला दिला होता. मात्र, त्याचा विचार झाला नाही.

शहराचा झाला गोठा
महापालिकेच्या हद्दीत तब्बल 692 गोठे असून 7 हजारांपेक्षाही जास्त जनावरे आहेत. कित्येक ठिकाणी तर भर रस्त्यावर जनावरे बांधून गोठे उभारले गेले आहेत. या गोठय़ांमधील शेण, कचरा, चारा व अन्य घाण थेट गटारात, ड्रेनेजमध्ये वा सार्वजनिक रस्त्यांवर सोडली जाते. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी, रोगराई व साथीचे आजार पसरतात. पावसाळ्यात तर हा त्रास कैक पटीने वाढतो.

प्रस्ताव धूळ खात पडून : चिकलाठाणा येथे 22 एकर, तर भावसिंगपुरा येथील 100 एकर जमिनीवर दुग्धनगरी विकसित करण्याचे मनपाचे नियोजन आहे. विशेष म्हणजे दुग्ध व्यवसाय प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव व भावसिंगपुरा येथील गोठय़ांसाठी राखीव असलेली जमीन शासनाने मनपाकडे हस्तांतरित करावी या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात धूळ खात पडून आहे. मनपाला चिकलठाणा येथे 22 एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली, पण कंगाल पालिकेकडे पैसा नसल्याने हा प्रकल्पही रखडला आहे.

काय आहे नेमका गुरे नियंत्रण कायदा? : गुरे नियंत्रण कायदा 1976 हा ज्या शहरी भागात लागू आहे, त्या भागात लोकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जनावर बंदी क्षेत्र लागू करता येते. मनपाचा पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा दुग्धविकास अधिकार्‍यांमध्ये ताळमेळ नसल्याने ही गोठय़ांची समस्या कायम आहे.

पर्यायी जागेची मागणी : दूध ही मूलभूत गरज आहे. त्यामुळे गोठे आणि जनावरांचे अस्तित्व राहिलेच पाहिजे. शिवाय हजारो लोकांचे संसार या धंद्यावर अवलंबून आहेत. त्यांच्यामुळे जनतेचीही दुधाची सोय होते. दोघांसाठीही हे गोठे आवश्यक आहेत. अनेक गोठेधारकांकडे परवाने आहेत. अनेक जण नियमित करही भरतात. तरीही शहरात गोठे नको असतील तर त्यासाठी महानगरपालिकेने पर्यायी जागा द्यावी, अशी मागणी गोठेधारकांनी वारंवार केली व आताही सातत्याने करत आहेत.

काय म्हणतात मान्यवर....
कुवारफल्लीत जाऊन स्वत: पाहणी करतो
अशी समस्या असेल तर कुवारफल्लीत जाऊन मी स्वत: या गोठय़ांची पाहणी करतो व संबंधितांना तत्काळ नोटीस बजावतो. या विषयावर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतही हा मुद्दा मांडला जाणार आहे.
-बी. एस. नाईकवाडे, -पशुसंवर्धन अधिकारी, मनपा

मनपाने गोठय़ांसाठी जागा द्यावी
आमचे गोठे या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. आम्ही ते स्वच्छही ठेवतो. पावसाळ्यात पावसाच्या पाण्यामुळे घाण होते, आम्ही त्याला काय करणार? महापालिकेने गोठय़ांसाठी चांगली जागा आम्हाला द्यावी, हीच आमची मागणी आहे. त्यामुळे यात आमचा काही दोष नाही.
-राधेश्याम बरेठिया, -गोठय़ांचे मालक, कुवारफल्ली

..तर धोका होतो
जेथे कुठे सडलेले अन्न असते, विष्ठा असते तेथे माशा असतात. माशा या सतत विष्ठा टाकतात व उलटी करत असतात. माशांमुळे अनेक प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. कॉलरा, डायरियाची साथ पसरू शकते. कचर्‍याजवळच जर अन्नपदार्थ विकणारी दुकाने असतील तर आणखीच धोका असतो.
-डॉ.जगन्नाथ दीक्षित, -सहयोगी प्राध्यापक, सार्वजनिक आरोग्य विभाग, घाटी

..तर उपोषण करणार
मनपाचा कारभार पाहून आपण पुन्हा पारतंत्र्यात गेलो, असे वाटते. शहरात जागोजागी कचर्‍याचे ढीग आहेत. मुलांच्या आरोग्याला मोठा धोका आहे, याचा मनपा विचारच करत नाही. कचरा हटवा, शहर स्वच्छ करा, यासाठी आता आम्हाला या वयात लढावे लागत आहे. कुणी तरी याची दखल घ्यावी. नाही तर आम्हा दोघांना उपोषणाला बसावे लागेल. तो शेवटचा पर्याय असेल. कचरा करणार्‍यांना, घाण करणार्‍यांना दंड करावा, असा कडक पवित्रा घेतल्याशिवाय हे शहर स्वच्छ होणार नाही.
-चंदाबेन व रतिलाल जरिवाला, -ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी

घाण म्हणजे डासांचे नंदनवन
नालीच्या बाजूला, कुजलेल्या कचर्‍यावर डासांची वस्ती असते. घाण म्हणजे आजारांसाठी नंदनवनच आहे. यामुळे मलेरिया, डेंग्यू , गॅस्ट्रो, कावीळ यांसारखे आजार होतात. शाळेच्या आजूबाजूला घाण असेल तर मुलांचे आरोग्य बिघडते. घरून स्वच्छ डबा आणि पाणी आणले तरी शाळेजवळ घाण असेल तर त्याचा काही उपयोग होत नाही. कारण त्यांच्या अन्नावर माशा बसतात, त्यामुळे ते दूषित होते.
-डॉ. अमोल अन्नदाते, -बालरोगतज्ज्ञ