आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयुक्तांचा चेकमेट; पदाधिकारी विरुद्ध कांबळे पुन्हा संघर्ष पेटणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- प्रभारी आयुक्त गोकुळ मवारे यांनी गेल्या आठवड्यात केलेल्या सातही बदल्यांना स्थगिती देत आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी पदाधिकारी आणि अधिकार्‍यांच्या युतीला चेकमेट दिला आहे. या निर्णयामुळे मनपात पदाधिकारी विरुद्ध आयुक्त असा संघर्ष भडकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय ज्या फायली मार्गी लावण्यात आल्या, त्यांचाही आढावा घेण्याचे काम आयुक्तांनी सुरू केल्याने मागील दोन महिन्यांत मनपात पदाधिकारी आणि अधिकार्‍यांनी केलेल्या उलाढाली अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

मसुरी येथे अडीच महिन्यांच्या प्रशिक्षणाला गेलेले मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे शनिवारी औरंगाबादेत परतले. सायंकाळी येताच त्यांनी चार्ज घेतला. आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज घेत कामाला प्रारंभ केला. महास्वच्छता अभियानात हाती झाडू घेऊन उतरलेल्या डॉ. कांबळेंनी सोमवारपासून अडीच महिन्यांतील निर्णयांची साफसफाई सुरू केली. राज्यपालांच्या दौर्‍यामुळे त्यांच्या स्वागत आणि निरोपाला हजर राहणार्‍या आयुक्तांनी दुपारच्या सुमारास पाच जणांच्या बदल्यांना स्थगिती देण्याचे आदेश काढले. या बदल्या गेल्या आठवड्यातच झाल्या होत्या. पदाधिकारी आणि अधिकार्‍यांच्या युतीने केलेल्या या बदल्यांना एका झटक्यात स्थगिती देत आयुक्तांनी आपला इरादा स्पष्ट केला आहे.

संघर्षाचा पार्ट टू : आयुक्त डॉ. कांबळे अडीच महिन्यांच्या सुटीवर जाण्याआधी ते आणि पदाधिकारी यांच्यात चांगलाच संघर्ष उभा राहिला होता. सत्ताधारी शिवसेनेने तर त्यांच्याविरोधात मोहीमच उघडली होती. मनपात खासदार चंद्रकांत खैरे यांचा हस्तक्षेप होत असतो. त्यालाच आयुक्तांनी सुरुंग लावला. पदाधिकार्‍यांच्या जवळचे असलेल्या सखाराम पानझडे यांच्याकडील ‘समांतर’चे काम जाता जाता आयुक्तांनी काढले होते. या आणि इतर बाबींमुळे पदाधिकारी विरुद्ध कांबळे असा संघर्ष सुरू झाला होता. आता आयुक्त परतले आणि या नाट्याचा दुसरा भाग सुरू झाला.

अडीच महिन्यांत काय काय झाले? : डॉ. कांबळे यांच्या जागी प्रभारी आयुक्त म्हणून आलेल्या गोकुळ मवारे यांचे पदाधिकार्‍यांशी चांगले संबंध निर्माण झाल्याने थांबवण्यात आलेली अनेक कामे मार्गी लागली. बांधकाम परवान्यांच्या फायली हलल्या. बिले निघाली, शिवाय अधिकारी आणि पदाधिकार्‍यांच्या सोयीसाठी बदल्या पण झाल्या. बदल्या तर शुक्रवारपर्यंत सुरूच होत्या. मवारे यांच्या फायली घेऊन सुभेदारीवर झालेल्या फेर्‍याही चर्चेच्या ठरल्या होत्या. अनेक कामांच्या फायली घेऊन पदाधिकारीदेखील मवारे यांच्या भेटीला जात असत. पण सर्वांच्या सोयीचे निर्णय घेण्यात आल्याने पदाधिकारी तसे खुशच होते. डॉ. कांबळे नसताना घेतलेल्या निर्णयांवरून आता संघर्ष भडकणार आहे.

दुपारनंतर बैठकांचे सत्र : आयुक्त डॉ. कांबळे सोमवारी मनपात आलेच नाहीत. राज्यपालांच्या दौर्‍यात हजेरी लावल्यानंतर त्यांनी थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र गाठत तेथे विविध विभागांच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. या बैठकीत आयुक्तांनी कोणती कामे झाली, कोणती बाकी आहेत याचा आढावा घेत सूचना केल्या.

सकाळी घेतलेला पदभार दुपारी सोडला : आज महसूल उपायुक्त सुरेश पेडगावकर यांच्या स्वाक्षरीने उपअभियंता आर. एन. संदा, शाखा अभियंता वामन कांबळे, प्रियंका केसरकर, शुभांगी आंधळे आणि सपना वसावा यांच्या बदल्या पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्याचा आदेश जारी करण्यात आला. याशिवाय अफसर सिद्दिकी, पी. के. खोब्रागडे यांच्या बदल्याही स्थगित करण्यात आल्या. आज सकाळी प्रियंका केसरकर यांनी घनकचरा कक्षप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला होता. पण दुपारी बदली आदेशाला स्थगिती येताच तो सोडावा लागला.
कर आकारणी विभागातील विशेष कक्ष प्रमुख प्रियंका केसरकर यांना घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख करण्यात आले होते, तर कर आकारणी विभागातील विशेष कक्षप्रमुख सपना वसावा यांची प्रशासकीय अधिकारी 2 या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. याशिवाय कर आकारणीतीलच शुभांगी आंधळे यांची कामगार अधिकारी म्हणून बदली करण्यात आली होती. तसेच पाणीपुरवठय़ाचे उपअभियंता आर. एन. संदा यांच्याकडे मालमत्ता व आकारणी विभागाच्या विशेष कक्षप्रमुखपदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. वामन कांबळे यांची बदली करण्यात आली, पण विभाग देण्यात आला नव्हता. आता बदल्यांना स्थगिती मिळाल्याने हे सारे जेथे होते तेथे परतले आहेत.

प्रयोगशाळा बनवू नये
आयुक्तांनी मनपाची प्रयोगशाळा करू नये. अधिकार्‍यांना किमान एक वर्ष तरी एका जागेवर काम करू दिले पाहिजे. तरच ते चांगली कामगिरी करू शकतील. अशा बदल्या, स्थगिती यामुळे नागरिकांची तसेच कोणतीही विकासकामे होत नाहीत.
-समीर राजूरकर, स्थायी समिती सदस्य