आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयुक्तांचे दणके: औरंगाबादेत 150 कोटींच्या कामांना कात्री; अंदाजपत्रकातील कामे लटकणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नगरसेवक, पदाधिकार्‍यांनी मनपाच्या तिजोरीचा जीव न पाहता कामे घुसवलेल्या अंदाजपत्रकाला स्थगिती देत आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दुसरा दणका दिला. यामुळे नगरसेवकांनी घुसवलेल्या 150 कोटींच्या कामांना कात्री लागली आहे. 350 कोटी रुपयांचे उत्पन्न असताना आणि ‘अंथरूण पाहून पाय पसरा’ असे सांगूनही 901 कोटी रुपयांपर्यंत फुगवलेले अंदाजपत्रक आयुक्तांनी तातडीने स्थगित केले. यामुळे कामासाठी पळापळ करणार्‍या नगरसेवक, पदाधिकार्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

डॉ. कांबळे यांनी दोन दिवसांपूर्वी बदल्या स्थगित केल्या आणि बुधवारी अंदाजपत्रकावर कुर्‍हाड घातली. त्यांच्या या निर्णयामुळे नगरसेवक, पदाधिकार्‍यांनी आपापल्या वॉर्डासाठी अंदाजपत्रकात घुसवलेल्या रस्ते, सौंदर्यीकरण, पाण्याच्या पाइपलाइन या कामांना ब्रेक लागला आहे. ही कामे आता होणे अवघड बनल्याने आयुक्तांविरोधात राजकीय मोर्चेबांधणी होण्याची शक्यता दिसू लागली आहे.

मतदारांसमोर कसे जाणार?
मागील तीन वर्षांत कुठलेही नवे काम हाती घेतलेले नाही. मनपाची आर्थिक अवस्था बिकट असल्याने स्पिल ओव्हरच्या (मागील अंदाजपत्रकातील) कामांशिवाय मोठी कामे हाती घेण्यात आली नाहीत. म्हणून आपापली कामे करून घेण्याची नगरसेवकांची धडपड सुरू होती. कारण आता हाती फक्त पुढचे बजेट असणार आहे. त्यानंतर निवडणुकाच आहेत. आधी लोकसभा आणि नंतर विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता येणार असल्याने उरलेल्या 18 महिन्यांतील एकच वर्ष खर्‍या अर्थाने नगरसेवकांच्या हाती असणार आहे. त्यामुळे कामे न झाल्यास पाच वर्षांत काय केले या मतदारांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी पुढार्‍यांची अडचण होणार असल्याने ही सारी धडपड सुरू आहे. अनेक पदाधिकार्‍यांनी खासगीत आम्ही कुठल्या तोंडाने मतदारांसमोर जाणार हेच आता समजेनासे झाले आहे, असे म्हटल्याचे कळते.

काहींचे टेंडरही निघाले
डॉ. कांबळे शहरात नसताना अर्थसंकल्पात ही घुसवाघुसवी झाली. फिलिं्डगबाज नगरसेवक, पदाधिकार्‍यांनी ही कामे मार्गी लावण्यासाठी प्रभारी आयुक्त गोकुळ मवारे यांच्या कारकीर्दीचा फायदा घेतला. अनेक कामे मंजूर करून घेण्यात आली, तर काही कामांचे टेंडरही काढण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयुक्तांनी अंदाजपत्रक बारकाईने वाचून काढताना काही कामांची माहिती घेतली असता टेंडरपर्यंत काही कामे पोहोचल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावर आयुक्तांनी वर्क ऑर्डरच्या वेळी पाहू, असे सांगत आगामी काळात आणखी धक्के देणार असल्याचे संकेतच दिले.

असे फुगत गेले बजेट
0 मार्च महिन्यात मनपा प्रशासनाने 596 कोटींचे अंदाजपत्रक तयार केले होते
0 आयुक्त डॉ. कांबळे यांनी त्याच वेळी हे अंदाजपत्रक वस्तुस्थितीला धरून नसल्याचे सांगताना मनपाचे उत्पन्न अंदाजपत्रकापेक्षा कमी असल्याने स्पिल ओव्हरचीच कामे करणे अवघड असल्याचे सांगितले होते
0 स्थायी समितीने 105 कोटी रुपयांची कामे सुचवत अंदाजपत्रक 701 कोटींपर्यंत फुगवले
0 नगरसेवकांच्या सूचना आणि कामांची मागणी लक्षात घेत सर्वसाधारण सभेने ते 901 कोटी रुपयांवर नेले होते. त्यालाच आता कात्री लावण्याची आयुक्तांची तयारी सुरू झाली आहे

उत्पन्न तोकडे, खर्च वाढवण्याची तयारी
मनपाचे उत्पन्न साडेतीनशे कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्यापेक्षा फार काही भर पडू शकत नाही हे स्पष्ट आहे. मनपाला सर्वाधिक 200 कोटींचे उत्पन्न एलबीटीमधून मिळते. कर आणि इतर मार्गांनी 150 कोटींचे उत्पन्न होते. त्यामुळे त्यातच सारे भागवण्याची कसरत करावी लागत असताना कामे घुसवून फुगवलेल्या अंदाजपत्रकामुळे आर्थिक अराजकासारखीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. स्वत: आयुक्तांनी मूळ अंदाजपत्रकानुसारच कामे व्हावीत, अशी भूमिका मांडताना आहे त्या उत्पन्नात फार तर देखभाल दुरुस्तीचे काम केले जाऊ शकते, असे म्हटले.

शहराची अवस्था बिकट होईल
स्थगिती देऊन कसे चालेल? कामे करावीच लागणार आहेत. कारण आम्हाला वॉर्डाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यामुळे बजेटसंदर्भात बैठक घेऊन त्यातून मार्ग काढायला हवा.
-नारायण कुचे, स्थायी समिती सभापती

यापेक्षा ‘त्यांनी’ उत्पन्न वाढवावे
अंदाजपत्रक ठेवताना नगरसेवकांनी कामे सुचवली. स्थायी समिती, सर्वसाधारण सभेची त्यांना मंजुरी आहे. आयुक्तांनी कामे स्थगित करण्यापेक्षा मनपाचे उत्पन्न वाढवण्यावर भर द्यावा.
-राजू वैद्य, नगरसेवक