आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Municipal Corporation Issue New Commissioner Dr.kambale

मालमत्ता करवसुलीवरही देणार भर; नवे आयुक्त डॉ. कांबळे यांची ग्वाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहर विकासावर होणारा खर्च आणि पालिकेचे उत्पन्न यात मोठी तफावत आहे. त्यामुळे मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीवर विशेष भर द्यावा लागणार असल्याचे संकेत नवे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिले. पिण्याचे पाणी उपलब्ध करणे, रस्ते विकासाचे मोठे आव्हान असताना करवसुलीतून यावर मात करण्यासाठी योजना आखली जाईल, असा मानस त्यांनी शुक्रवारी (8 फेब्रुवारी) त्यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.


आग संशयास्पदच : महापौर ओझा
"मनपातील आस्थापना दोन विभागात 5 फेब्रुवारीला लागलेली आग संशयास्पदच आहे, असे महापौर कला ओझा यांनी सांगितले. सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज, पदाधिकारी आणि कर्मचार्‍यांनी दिलेली माहिती यात साधम्र्य नसल्याने या प्रकरणाचे गूढ आणखीनच वाढले असल्याचेही त्या म्हणाल्या.
याबाबत 10 फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती ओझा यांनी पत्रकारांना दिली. सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील फुटेजची सूक्ष्म पाहणी केली असता त्यात आगीचा गोळा पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. पण त्यापूर्वीचे आणि नंतरचे फुटेज दिसत नसल्याने यामागे काहीतरी गौडबंगाल असण्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. सीसीटीव्ही कॅमेर्‍यात सकाळपासूनचे फुटेज असणे क्रमप्राप्त होते. परंतु त्यात केवळ रात्रीचीच दृश्ये कशी काय असू शकतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अहवाल आल्यानंतर बर्‍याच गोष्टी बाहेर येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, यापुढे कुठल्याही विभागात आग लागली तर संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना जबाबदार धरण्यात येईल, असे परिपत्रक आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी काढले आहे."

दुष्काळी परिस्थितीत शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येईल. यासाठी 5 कोटी 12 लाख रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून जायकवाडी धरणातील डाव्या कालव्यातून गाळ काढण्यात येणार आहे. जालना, ग्रामीण भागात पाणीपुरवठा व्हावा, यासाठी 15 कोटींचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तो मंजूर झाला तर जून, जुलैमध्ये पाऊस पडला नाही तरी पाण्याचे नियोजन करता येणार असल्याचे डॉ. कांबळे म्हणाले.

31 मार्चपर्यंत समांतर जलवाहिनीच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. आज ठिकठिकाणी पाहणी केली असता शहरातील काही भाग स्वच्छ, तर काही ठिकाणी अस्वच्छता दिसली. नियोजनाप्रमाणे रस्ते विकासावर 50 कोटी खर्च करण्यात येतील, असे ते म्हणाले. सुरुवातीला 30 रस्त्यांचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर बजेटप्रमाणे उर्वरित 20 रस्त्यांचे काम हाती घेण्यात येईल. यंदाच्या आर्थिक वर्षात 786 कोटींचे बजेट आहे. परंतु यातील 50 टक्के करवसुली होणार आहे. यामुळे विकासकामांवर याचा परिणाम होईल. त्यासाठी मालमत्ता करवसुलीकडे अधिक लक्ष द्यावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच 2013-14 च्या अर्थसंकल्पात अधिक खर्चाची तरतूद करावी लागणार आहे. करवसुलीसाठी कर्मचारी कमी आहेत. याविषयी विभागीय आयुक्तांना माहिती दिली असून करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.

डॉ. कांबळे यांची गगनभरारी
डॉ. कांबळे हे भंडारा जिल्ह्यातील बेला या लहानशा गावचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. त्यांना तीन भावंडे आणि एक बहीण आहे. आपला मोठा मुलगा इंजिनिअर आणि लहान मुलगा डॉक्टर व्हावा, असे त्यांच्या आईला वाटत होते. त्याप्रमाणे त्यांचा मोठा भाऊ अमेरिकेत इंजिनिअर आहे व वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर ते प्रशासकीय अधिकारी आहेत. डॉ. कांबळे यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथील सैनिकी शाळेत झाले. त्यांनी मिरजमधून एमबीबीएसचे शिक्षण घेतले. डिफेन्स किंवा एअरफोर्समध्ये करिअर करण्याची त्यांची इच्छा होती, परंतु ते शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी वैद्यकीय व्यवसायातून समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला. परंतु आणखी काहीतरी आव्हानात्मक करण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी डॉक्टरची नोकरी सोडून यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. पहिल्या प्रयत्नात पूर्व व लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीत त्यांना अपयश आले. यातून नैराश्य आल्याने चहाची टपरी टाकून व्यवसाय करण्याचा विचारही त्यांच्या मनात आला होता. परंतु दृढ निश्चय करून त्यांनी पूर्ण तयारीनिशी दुसर्‍यांदा परीक्षा दिली व यश संपादन केले. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले.