आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aurangabad Municipal Corporation Junior Engineer Fighting Issue

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभियंता मारहाण प्रकरण: नेते-अधिकार्‍यांच्या युतीमुळे मोटेंनी घेतली माघार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राजकीय नेते आणि अधिकारी यांच्या युतीमुळे काम करणार्‍या अधिकार्‍यांना मारहाण होऊनही नेत्यांवर कारवाई होत नाही हे मोटे मारहाण प्रकरणात पुन्हा एकदा स्पष्ट झाले. दबावतंत्राचा वापर करीत या प्रकरणात स्थायी समिती सभापती नारायण कुचे यांना अलगद बाहेर काढण्यात ही युती यशस्वी झाली आहे.

मुकुंदवाडीतील संघर्षनगरात शनिवारी मोटे यांच्यामुळेच गढूळ पाणी येते, असा आरोप करत स्थायी समिती सभापती नारायण कुचे यांनी बूट काढून मारले. कुचे यांनी त्या घटनेचा इन्कार केला होता. या संदर्भात महानगरपालिका अधिकारी संघटना कठोर पावले उचलून आंदोलनाचा इशारा देऊन कडक कारवाईची मागणी लावून धरेल, असे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र तसे झाले नाही.

गेल्या दहा वर्षांत मनपाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना मारहाण करण्याचे जवळपास 15 प्रकार घडले आहेत. यापैकी एकाही प्रकरणात राजकीय नेत्यांना शिक्षा झाल्याचे अथवा कारवाई झाल्याचे उदाहरण नाही. या वर्षातच असे तीन प्रकार घडले आहेत. करवसुली अधिकार्‍याला नगरसेवक त्र्यंबक तुपे यांनी मारहाण केली होती, तर प्रशासकीय अधिकारी प्रियंका केसरकर आणि नगरसेविका प्रीती तोतला यांच्यात गेल्या महिन्यात अतिक्रमण हटवण्यावरून भर रस्त्यावर वाद झाला होता.

दोन दिवसांत काय झाले? : जखमी मोटे यांनी सभापती कुचे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली तर अडचणीचे ठरू शकते, हे ध्यानात घेऊन राजकीय हालचाली सुरू झाल्या. मोटे यांना नेत्यांचे आणि अधिकार्‍यांचे फोन सुरू झाले. हे प्रकरण फार ताणले जाणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. ती यशस्वी झाल्याचे सोमवारी दिसून आले.

अधिकारी संघटना तटस्थ : मनपा अधिकारी संघटनेने मोटे यांना अनोळखी नागरिकांनी शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याने त्यांच्या
डोळय़ाला इजा झाल्याचे म्हटले आहे. आयुक्त गोकुळ मवारे यांना दिलेल्या निवेदनासोबत मोटे यांचे पत्र असून त्यातदेखील कुचे यांनी मारहाण केल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे आयुक्त मवारे यांनी संबंधित मोटे यांनी व्यक्तिगत तक्रार दिली पाहिजे, मग मनपा प्रशासन तक्रार देईल, अशी भूमिका घेतली.

येथे खरी मेख : मनपा अधिकारी संघटनेचे अध्यक्ष कार्यकारी अभियंता सखाराम पानझडे यांनी मोटे यांची भेट घेतली होती. पानझडे हे शहर अभियंता पदाच्या शर्यतीत आहेत. त्यांचे आणि कुचे यांचे चांगले संबंध असून शहर अभियंता पदाच्या बाबतीत कुचे यांची मोठी मदत त्यांना होत आहे. अशा स्थितीत कुचे अडचणीत येणे परवडणारे नसल्याने तक्रार ‘माइल्ड’ करण्यात आली असावी, असे मनपातील अधिकारीच बोलत आहेत. नेते आणि अधिकार्‍यांच्या मैत्रीमुळे अधिकार्‍यांना वाचवण्यासाठी कोणी पुढे येणार नाही, असे या प्रकारावरून स्पष्ट झाले आहे.

अधिकार्‍यांचे संरक्षण ही माझी जबाबदारी : सभापती कुचे म्हणाले की, मी मोटे यांना मारहाण केलेलीच नाही. त्यामुळे यात कुठे अँडजस्टमेंट किंवा दबाव आणायचा प्रश्न नाही. खरे तर मनपाच्या अधिकार्‍यांचे संरक्षण करणे ही मी माझी जबाबदारी मानतो.

कुचेंनी घेतली मोटेंची भेट
कुचेंनी मारहाण केली नसल्याचे काल मोटे यांनी सांगितले. कुचे यांच्या केबिनजवळच मोटे सर्व माहिती देत होते. त्यांच्या माघारीचे वृत्त अधिकृत झाल्यावर मंगळवारी सकाळीच त्यांनी मोटे यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली. विशेष म्हणजे त्यानंतर मोटे यांचा फोन ‘नॉट रिचेबल’ आहे!

आम्ही मोटेंच्या पाठीशी
आम्ही मुळीच मवाळ भूमिका घेतलेली नाही. मोटे यांना शिवीगाळ करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करावी असे पत्रच आयुक्तांना दिले आहे. मोटे यांच्या पाठीशी आम्ही आहोत.
- सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा.

एक महिना कैदची तरतूद
सरकारी कर्मचार्‍यांना मारहाण केल्यास कलम 353, 333, 334 अन्वये गुन्हा दाखल होतो. हा अजामीनपात्र गुन्हा आहे. यामध्ये 353 अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते, तर 333 कलमानुसार मारहाण, जखमी केल्यास दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते. तर कलम 334 नुसार अचानक आणि हेतू नसेल तर 1 महिना कैद, 500 रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते.
-अँड. राजेंद्र मुगदिया, सरकारी वकील