आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Municipal Corporation Latest News In Divya Marathi

युती तुटल्याने पालिकेत आनंदाच्या उकळ्या, मनपा निवडणुकीत दोन्ही पक्षांना सर्वच वॉर्डांत लढणे शक्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शिवसेना-भाजप युती तुटल्याने कोणाला आनंद झाला, तर कोणाला वाईट वाटले. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर बरोबर सहा महिन्यांनी होणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या सेना-भाजपच्या भावी नगरसेवकांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. जागावाटपात अनेकांना पालिका निवडणूक लढण्याची संधी मिळाली नव्हती. काहींना अपक्ष म्हणून लढावे लागले होते. आता मात्र दोन्ही पक्षांना मोकळे रान मिळाले आहे. प्रभाग आरक्षणाचा तेवढा अडथळा शिल्लक असल्याचे काहींनी बोलून दाखवले.
पालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभागांची संख्या 50 च्या पुढे, तर नगरसेवकांची संख्या 120 च्या आसपास असणार हे स्पष्ट झाले आहे. 2010 च्या निवडणुकीत युतीच्या जागावाटपात 99 पैकी 50 जागा शिवसेनेकडे, तर 40 जागा भाजपकडे होत्या. मुस्लिमबहुल पट्ट्यातील 9 जागा युतीने लढवल्या नव्हत्या.
युती असती तर आगामी निवडणुकीतही असेच चित्र राहिले असते. कदाचित 70 जागा सेनेकडे, तर उर्वरित 45 ते 50 जागा भाजपला दिल्या जातील, असे चर्चेचे संकेत होते. परंतु आता युती दुभंगल्याने सर्व प्रभागांत दोन्हीही पक्ष लढू शकतात. या मतविभाजनाचा फायदा काँग्रेस आघाडीला होईल, अशी सामान्यांची भावना असली तरी लढणारे उमेदवार त्याचा विचार करत नाही. सेनेचा बालेकिल्ला गुलमंडीला लागून असलेला औरंगपुरा वॉर्ड आतापर्यंत भाजपकडे राहिला आहे. त्यामुळे येथे सेनेच्या कार्यकर्त्यांना लढता आले नव्हते. गुलमंडीबरोबरच औरंगपुराही सेनेचाच बालेकिल्ला आहे, हे दाखवून देण्याची संधी यानिमित्ताने चालून आल्याचे येथील कार्यकर्त्यांनी सांगितले.

सिडको-हडको ही मध्यमवर्गीयांची वसाहत कायम युतीसोबत राहिली आहे. जागावाटपात या टप्प्यात सेनेने भाजपला बऱ्यापैकी जागा दिल्या होत्या. त्यामुळे येथील किती जागा कोणाच्या पारड्यात जातात यावरच पालिकेत सत्ता कोणाची हे ठरू शकेल. सत्तेचे काय व्हायचे ते होईल, पण या पट्ट्यात प्रत्येक प्रभागात सेनेबरोबरच भाजपचाही उमेदवार असेल. त्यामुळे सत्तेचे समीकरण बिघडणार की तगणार हे जेव्हा ठरायचे तेव्हा ठरेल, पण सर्वत्र लढणे शक्य होणार असल्याने दोन्हीही बाजूच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी गतवेळी एकत्रित लढले नव्हते. पालिका निवडणुकीत त्यांचे कधीही सख्य नव्हते. त्यामुळे या वेळी ते एकत्र लढले काय किंवा वेगळे लढले काय, त्यामुळे फारसा फरक पडणार नाही.
महापालिकेत युतीचेच पदाधिकारी
महापौर, उपमहापौर किंवा स्थायी समितीच्या सभापतिपदांवर अविश्वास प्रस्ताव आणता येत नाही. निवडणूक होईपर्यंत फक्त राजकीय बलाबल महत्त्वाचे असते. त्यामुळे एप्रिल महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होईपर्यंत औरंगाबादचे महापौर, उपमहापौर किंवा अन्य कोणताही पदाधिकारी बदलला जाणार नाही. राज्यात युती तुटली असली तरी पालिकेत मात्र पदाधिका-यांना युतीचेच पदाधिकारी म्हणून मिरवावे लागेल.