आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Municipal Corporation New Commissioner Dr. Harshdeep Kambale

पाणी, रस्त्यांचा विकास, स्वच्छतेवर भर देणार; आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांचा ‘अजेंडा’!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरातील भीषण पाणी समस्या, रस्ते आणि स्वच्छता या तीन मुद्दय़ांवर नवे महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे अधिक भर देणार आहेत. हा त्यांचा अजेंडा असल्याचे संकेत आज (7 फेब्रुवारी) ‘दिव्य मराठी’ला मिळाले.

दोन आठवड्यांची प्रतीक्षा गुरुवारी संपली. डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सायंकाळी सहाच्या सुमारास मनपा आयुक्तपदाची सूत्रे डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडून स्वीकारली. औरंगाबादेतील मित्रपरिवाराकडून शहराची माहिती त्यांनी आठवडाभरापूर्वी गोळा केली. पालिका कार्यालयात आगमन होताच त्यांनी डॉ. भापकरांकडून काही टिप्स घेतल्या. पालिकेतील विभागप्रमुखांची छोटेखानी बैठक घेऊन परिचय करून घेतला.

शासनाने 21 जानेवारी रोजी डॉ. कांबळे यांच्याकडे कार्यभार सोपवला. मात्र, त्यांची मुंबईतच काम करण्याची इच्छा होती. तसे त्यांनी प्रयत्नही केले, पण त्यास प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यांनी पदभार स्वीकारण्याचा निर्णय घेतला. बुधवारी दुपारी तसा निरोप त्यांनी डॉ. भापकर यांनाही दिला होता. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार त्यांनी सायंकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी पदभार स्वीकारला.

नियुक्तीचे आदेश हातात पडल्यानंतर कांबळे यांनी त्यांच्या औरंगाबादेतील काही मित्रांशी संपर्क साधला होता. येथील राजकीय परिस्थिती, अधिकार्‍यांमधील गट-तट, रस्ता रुंदीकरण मोहीम आणि या मोहिमेतील अडथळे, समांतर जलवाहिनी आदींची माहिती घेतली.

अफवांना पूर्णविराम
पालिकेत राजकीय वातावरण, अधिकार्‍यांचे राजकारण, विकासकामांतील अडथळे यामुळे डॉ. कांबळे येथे येणारच नाहीत, त्यांची केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या स्वीय सचिवपदी बदली झाल्याचे आदेश निघाले आहेत, अशा अफवा पसरल्या होत्या. पण आज त्यांनी पदभार स्वीकारल्याने अफवांना पूर्णविराम मिळाला.

कर्तबगार अधिकारी
डॉ. कांबळे 1997 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. 1998 मध्ये अहमदनगर येथून सहायक जिल्हाधिकारी, अकोला येथे उपविभागीय अधिकारी, नंदुरबार जिल्हा परिषदेचे सीईओ, यवतमाळचे जिल्हाधिकारी, ग्रामविकास व जलसंधारण खात्याचे उपसचिव, न्याय विभाग दिल्ली येथे खासगी सचिव म्हणून काम पाहिले.

डॉ. कांबळेंपुढील आव्हाने
>पाणीटंचाईच्या संकटावर मात करणे
>समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण करणे
>शहर रस्ते विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवणे
>पर्यटनस्थळांचा विकास, सफाई मोहीम

भापकर अन् तीन महापौर
डॉ. भापकर यांनी 2009 मध्ये आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली होती. विजया रहाटकर, अनिता घोडेले, कला ओझा या तीन महापौरांच्या कार्यकाळात आयुक्त म्हणून काम करण्याचा अनुभव असलेले ते मनपाच्या इतिहासातील पहिले आयुक्त ठरले.