आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरिष्ठ नेते म्हणतात, महापौरांचा राजीनामा सहजासहजी नाहीच, पक्षप्रमुख योग्य वेळी योग्य निर्णय घेतील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - युतीत झालेल्या करारानुसार ३१ ऑक्टोबरपर्यंत महापौर त्र्यंबक तुपे यांचा राजीनामा अपेक्षित आहे. परंतु ते इतक्या सहजासहजी शक्य होणार नसल्याचे संपर्कनेते विनोद घोसाळकर यांनी स्पष्ट केले. श्रेष्ठीच यावर अंतिम निर्णय घेणार असून सेनेशी भाजपचे वागणे तसेच मुंबई मनपातील युतीच्या पार्श्वभूमीवर थोडीशी अडचण येऊ शकते, अशा शब्दांत घोसाळकर यांनी सेनेतील 'अंडर करंट्स' वेगळ्याच मताचे असल्याचे संकेत दिले आहेत.

नगर परिषद निवडणुकांत जेथे भाजप कमजोर आहे तेथे शिवसेनेशी युती करा, जेथे आपण मजबूत आहोत तेथे युती करू नका, असे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे, युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल, असे सांगण्यात येते. मुंबई मनपा निवडणुकीत युती करायची नाही, असे वक्तव्य भाजपच्या नेत्यांकडून वारंवार करण्यात येते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती करायचीच नाही, असे कार्यकर्त्यांना सांगितले. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर मनपातील युतीचे काय, असा प्रश्न स्थानिक कार्यकर्त्यांना पडला आहे. महापौर त्र्यंबक तुपे यांना वरिष्ठांकडून अजून काहीही सांगण्यात आलेले नाही. आदेश आल्यानंतर ते राजीनामा देतील, हे स्पष्ट आहे.

परंतु त्यांना आदेश नेमका काय येणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. करारानुसार ३१ ऑक्टोबरच्या आसपास विद्यमान महापौर उपमहापौर राजीनामा देतील. परंतु युतीतील वादाच्या पार्श्वभूमीवर महापौर राजीनामा देणार नाहीत, असा एक मतप्रवाह आहे. २००८ मध्ये तत्कालीन भाजप महापौर विजया रहाटकर यांनी दोन्ही पक्षातील वादामुळे पदाचा राजीनामा दिला नव्हता. त्यामुळे सेनेचे एक महापौरपद हुकले होते. या वेळी तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

^सध्याचेवातावरणगंभीर आहे. युतीतील सर्व बाबींचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल. मुंबई महानगरपालिका तसेच राज्यातील नगर परिषदांच्या निवडणुकीतील युतीबाबत भाजपच्या भूमिकेमुळे थोडीशी अडचण येऊ शकते. करार संपण्यास अजून अवधी आहे. योग्य वेळी योग्य निर्णय पक्षप्रमुख घेतील. -विनोद घोसाळकर, संपर्कनेते, शिवसेना
बातम्या आणखी आहेत...