आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Municipal Corporation News In Marathi, Nehar e Ambari, Divya Marathi

मनपा नहर-ए-अंबरीच्या सर्वेक्षणाबाबत बेफिकीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मागील पावसाळ्यात नहर-ए-अंबरी व नहर-ए-पाणचक्कीच्या सर्वेक्षणाचे काम अर्धवट राहिले. या वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हे काम होणे अपेक्षित होते; पण एप्रिलचा अर्धा महिना सरला तरी सर्वेक्षणाबाबत हालचाल होताना दिसत नाही. मनपा प्रशासनाने यासंदर्भातील विनंती पत्र खंडपीठाला सादर केले आहे. मात्र, त्याचा विसर पडला आहे. मनपाच्या चालढकल प्रवृत्तीमुळे नहरींचे संवर्धन कसे होणार, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
नहरींच्या संवर्धनासाठी खंडपीठाने एप्रिल-2013 मध्ये सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. त्यानुसार 17 एप्रिल 2013 रोजी नहर-ए-अंबरीच्या बाह्य सर्वेक्षणास, तर 20 एप्रिलला पाणचक्कीच्या सर्वेक्षणास प्रारंभ करण्यात आला. 24 एप्रिलला बाह्य सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयास सादर करण्यात आला. त्यानंतर अंतर्गत सर्वेक्षणाचे आदेश न्यायालयाने दिले. सर्वेक्षण समितीने नहर-ए-पाणचक्कीच्या अंतर्गत सर्वेक्षणाचा अहवालही सादर केला आहे; परंतु नहर-ए-अंबरीचे अंतर्गत सर्वेक्षण अद्याप पूर्ण झालेले नाही. समितीला दोन्ही नहरींचे 141 मेनहोल सापडले असून 59 मेनहोल सापडलेले नाहीत. नहर-ए- पाणचक्कीच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करताना पावसाळा असल्याने उर्वरित सर्वेक्षणाचे काम जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात करण्याची परवानगी मनपाने न्यायालयाकडून मिळवली होती. प्रत्यक्षात एप्रिल महिना उजाडला, तरी सर्वेक्षणाला सुरुवात झालेली नाही.
पाणी गेले वाहून
न्यायालयाने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सर्वेक्षण करण्याचे आदेशित केले आहे; पण एप्रिल महिन्याचा पंधरवडा सरत आला, तरी सर्वेक्षणाबाबत पाऊल उचलण्यात आले नाही. मनपाच्या दुर्लक्षामुळे यंदा 23 कोटी लिटरपेक्षा अधिक पाणी वाहून गेले आहे. रमजान शेख, नहरीचे अभ्यासक, सर्वेक्षण समितीचे सदस्य.
आदेशाची प्रतीक्षा
नहर-ए-अंबरीच्या अंतर्गत सर्वेक्षणाचे काम बाकी आहे. त्यासाठी मनपा प्रशासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. त्यांनी काम करण्यास सांगितल्यानंतर आठ दिवसांत सर्वेक्षणाचे काम हाती घेतले जाईल. प्रदीप देशपांडे, आर्किटेक्ट, सर्वेक्षण समिती.
सर्वेक्षण लवकरच
नहरीच्या सर्वेक्षणाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल. सर्वेक्षण नेमके कधी करणार याबाबत सध्या सांगता येणार नाही. यासंदर्भात बैठक घेऊन तत्काळ निर्णय घेऊ. डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त, मनपा.