आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Municipal Corporation News In Marathi, Slap, Divya Marathi

मनपा अधिकार्‍याने ज्येष्ठाच्या कानशिलात मारली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मदनी चौक, बायजीपुरा भागात करवसुलीसाठी गेलेल्या पथकाची आणि नागरिकांची वादावादी होऊन त्यात पथकातील अधिकारी प्रियंका केसरकर यांनी व्यापार्‍याकडे काम करणार्‍या कर्मचार्‍याला कानशिलात मारली. यासंदर्भात जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून केसरकर यांनीही नागरिकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे.


बायजीपुर्‍यातील मदनी चौकात शेख आसिफ यांची रॉयल फर्निचर ही तीनमजली इमारत आहे. तेथे करवसुलीसाठी केसरकर यांच्या नेतृत्वाखाली पथक दुपारी दोनच्या सुमारास दाखल झाले. शेख यांनी न्यायालयाच्या आदेशाची काही कागदपत्रे दाखवून कारवाई रोखण्याची विनंती केली. त्याला केसरकरांनी नकार देत शटरला कुलूप ठोकण्याचा आदेश दिला. तो पाहून शेख यांच्याकडील कर्मचारी शेख रईस यांनी त्यांना कागदपत्रे दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला. तेव्हा संतापलेल्या केसरकर यांनी त्याच्या श्रीमुखात भडकावून दिली. त्यांनी केसरकर यांच्यासह काही कर्मचार्‍यांना धक्काबुक्की केली.


परिस्थिती आटोक्याबाहेर जात असल्याचे लक्षात येताच केसरकर यांनी जिन्सी पोलिस ठाणे गाठले. तेथे धक्काबुक्की झाल्याची तक्रार दिली. यानंतर घटनास्थळी पोलिसांनी व्हॅन पाठवून बंदोबस्त वाढवण्यात आला. तोपर्यंत बायजीपुर्‍यातील जमाव पोलिस ठाण्यात दाखल झाला. रईस, आसिफ शेख यांनीही धक्काबुक्की झाल्याची तक्रार दिली. केसरकर यांच्या तक्रारीवरून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवला आहे, तर रईस यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीनंतर कारवाई करू, असे मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले.