आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेकॉर्ड अपडेट न करता महानगरपालिकेने दिल्या लाखोंच्या नोटिसा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सिडकोतील मालमत्ता फ्री होल्ड झालेल्या नसताना म्हणजे या मालमत्तांची मालकी आजही सिडकोकडे असताना त्या मालमत्तांना करवसुलीच्या लाख-लाख रुपयांच्या नोटिसा पाठवण्याचा धडाका मनपाने लावल्याने सिडको-हडको भागातील व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. या विषयावर तोडगा न निघाल्यास मनपाला जनता व व्यापार्‍यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

मालमत्ता करवसुलीचे टार्गेट गाठण्यासाठी मनपाने या वर्षी जोर लावला असून एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत 22 कोटी रुपयांची वसुली केली. यासाठी सध्या व्यावसायिक मालमत्ता मनपाने रडारवर घेतल्या आहेत. शहरातील 20 हजार व्यावसायिक मालमत्तांपैकी 1244 जणांनी एक लाख रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता कर थकवला आहे. या सर्वांकडे थकलेली रक्कम 48 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. नोटिसा पाठवणे, जप्ती करणे यात मनपाचे करवसुली पथक गुंतले असले तरी प्रत्यक्षात करवसुलीदरम्यान मनपाच्या कारभाराचेच धिंडवडे निघत आहेत.

सिडकोतील व्यावसायिक मालमत्ता मनपासाठी डोकेदुखी ठरणार आहेत. याची सुरुवात झाली आहे. या मालमत्तांबाबत मनपाने हस्तांतरणानंतर करावयाची कार्यवाही न केल्याने हा पेच उभा राहिला आहे. सिडको एन-3 भागातील सुनील लोहारकर यांचे उदाहरण मनपाचा कारभार कसा चालतो हे दाखवणारे आहे. लोहारकर यांनी सिडकोकडून 1990 मध्ये भूखंड घेतला. त्याचे कंप्लिशन घेतले. एनए चार्जेस भरले. कर नियमित भरला. 2005 पर्यंत म्हणजे ही मालमत्ता सिडकोकडे असेपर्यंत सिडकोकडील सर्व करांचा भरणा त्यांनी केला. 2006 मध्ये सिडको मनपाकडे हस्तांतरित झाले. त्या वेळी सिडकोतील मालमत्ता फ्री होल्ड करून दिल्या जातील असे सांगण्यात आले होते. ते आजवर झाले नाही. त्यामुळे या मालमत्तांची मालकी सिडकोचीच आहे. असे असताना मनपाने आपल्याकडील रेकॉर्ड अपडेटच केले नाही. परिणामी करवसुलीतील घोळ सुरू झाले. 2007 मध्ये लोहारकर यांना चुकीच्या पत्त्याचे, अपूर्ण नावाचे बिल आले. मे महिन्यात 5 हजार 568 आणि 12 हजार 178 रुपयांचे बिल देण्यात आले. तेदेखील अपूर्ण नावाचे. यासंदर्भात सिडको विभागाच्या उपायुक्तांकडे अर्ज दिल्यानंतर सुनावणी झाली व त्यात मोजमाप करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. लोहारकर म्हणाले की, आज 2013 पर्यंत ना मोजमाप झाले ना काही झाले. त्यानंतर थेट 14 डिसेंबर 2012 ला 11 हजार 288 व 27 हजार 690 रुपयांची बिले आली. त्यात 1 एप्रिल 2006 पासून आकारणी असल्याचे म्हटले. यासंदर्भात कार्यकारी अभियंता व मनपा आयुक्तांना सविस्तर निवेदन देत दुरुस्तीची विनंती लोहारकर यांनी केली. पण त्यावरही आजतागायत काही झाले नाही.

सिडकोतील इतर मालमत्तांचाही प्रश्न
हा केवळ लोहारकर यांच्या एकट्याचा प्रश्न नसून सिडको भागातील हजारो व्यावसायिकांना या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. केवळ फ्री होल्ड झाले नाही आणि मनपाने आपले रेकॉर्ड अपडेट केले नाही म्हणून ही समस्या उद्भवली आहे.

आयुक्तांना भेटणार
यासंदर्भात सुनील लोहारकर यांनी सांगितले की, या प्रश्नाबाबत आपण आयुक्तांना निवेदन दिले आहे. शिवाय आता पुन्हा प्रत्यक्ष भेटून एकदाचा हा तिढा संपवा, अशी विनंती करणार आहोत. शिवाय या भागातील व्यापार्‍यांशीही चर्चा करण्यात येईल.

फाइल पाहूनच निर्णय घेऊ
उपायुक्त शिवाजी झनझन यांनी सांगितले की, या प्रकरणाची माहिती कळाली आहे. पण प्रत्यक्ष फाइल पाहून आणि कागदपत्रे तपासूनच याबाबत निर्णय घेतला जाईल.

कर भरा, नाहीतर जप्ती !
मालमत्ता कराचे मागचे झेंगट मनपाने निस्तरले नाहीच, वर या वर्षी 30 मे रोजी 1 लाख तीन हजार 64 व 2 लाख 55 हजार 84 रुपयांची मागणी करणारी कराची नोटीस मनपाने लोहारकर यांना बजावली. या नोटिसा पाहून लोहारकर कुटुंब हादरूनच गेले. काल मनपाचे पथक दारात आले. कर भरा नाही तर जप्ती आणू, असे सांगत निघून गेले.