आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Municipal Corporation Now Start Competitive Exam, Divya Marathi

महापालिका सुरू करणार स्पर्धा परीक्षेचे वर्ग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न अनेक विद्यार्थी बघतात. पण या परीक्षेच्या तयारीसाठी योग्य मार्गदर्शन आवश्यक असते. अशी तयारी करून घेणार्‍या अनेक खासगी संस्था आहेत. मात्र त्यांचे शुल्क सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडत नाही. ही बाब लक्षात घेऊन मनपाने गरजूंसाठी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आमखासजवळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात हे वर्ग चालणार असून सुसज्ज गं्रथालय, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, 24 तास इंटरनेटसह संगणक लॅब आदी सुविधा येथे मिळतील. येत्या जूनपासून हे वर्ग सुरू होतील.
दरवर्षी लाखो विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेला बसतात, परंतु योग्य मार्गदर्शनाअभावी यापैकी अगदी बोटावर मोजण्याएवढेच विद्यार्थी उत्तीर्ण होतात. त्यातही मौखिक परीक्षा देऊन शेवटपर्यंत पोहोचणारे थोडेच असतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणार्‍या खासगी शिकवण्यांचे शुल्क सर्वसामान्यांना परवडणारे नसते. यामुळेच प्रशासकीय सेवेत मराठी मुलांचा टक्का कमी आहे. ही बाब लक्षात घेऊन मनपाने खास राज्य आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी, यूपीएससी) परीक्षांचे तीन महिन्यांचे प्रशिक्षणवर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.
सर्व सुविधांचा समावेश
मनपाच्या वतीने चालवल्या जाणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात हे वर्ग घेतले जातील. त्यासाठी केंद्राच्या 2014-15 च्या बजेटमध्ये 25 लाख रुपयांच्या निधीची सोय करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी लागणार्‍या सर्व सुविधा पालिका पुरवणार आहे. यात प्रामुख्याने इंटरनेट सुविधेसह 5 संगणकांचा समावेश आहे. इंटरनेटमुळे विद्यार्थ्यांना जगभरातील अद्ययावत ज्ञान घेता येईल. एखादी शंका असेल तर ती लगेच इंटरनेटच्या माध्यमातून सोडवता येईल. संशोधन केंद्रात अद्ययावत असे ग्रंथालय आहे. यात भर म्हणून स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी खास पुस्तके खरेदी केली जाणार आहेत. यासाठी दिल्लीतील नामांकित प्रकाशकांना संपर्क करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी त्या-त्या विषयातील तज्ज्ञांना निमंत्रित केले जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील तज्ज्ञांनाही येथे बोलावले जाणार आहे.
प्रवेशासाठी आरक्षण
प्रशिक्षण वर्गात प्रवेशासाठी आरक्षण असेल. 50 टक्के जागा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत, तर उर्वरित प्रवेश खुल्या संर्वगातून दिले जातील. यासाठी 500 रुपये शुल्क असेल. सकाळी साडेआठ ते साडेदहा आणि सायंकाळी साडेचार ते साडेसहा अशा दोन बॅचेसमध्ये वर्ग चालतील. एका बॅचमध्ये 50 विद्यार्थ्यांचा समावेश असेल. प्रवेशासाठी वृत्तपत्रात जाहिरात देऊन अर्ज मागवले जातील. पदवी झालेले किंवा पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असतील. गुणवत्तेनुसार प्रवेश दिले जातील. आचारसंहितेमुळे जाहिरात देण्याचे काम रखडले आहे. 16 तारखेनंतर या कामाला वेग येईल. प्रशिक्षक, पुस्तके, विद्यार्थी प्रवेश असे सर्वकाही व्यवस्थित जुळून आले तर एक जूनपासून हे वर्ग सुरू करण्याचा पालिकेचा मानस आहे.