आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप दाखवा, नाही तर श्राद्ध घाला; शिवसेनेकडून भाजपला आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापालिका निवडणुकीच्या काळात समांतर जलवाहिनी योजनेची चौकशी करण्याचे आश्वासन देणार्‍या पालकमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी समांतरला जाहीर पाठिंबा दिला. या योजनेच्या आड येणार्‍यांना आडवे करू असे म्हणत समांतरमधील भ्रष्टाचाराबाबत नुसते आरोप करू नका. आधी पुरावे द्या. बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला, असे भाजपच्या स्थानिक नेत्यांना खुले आव्हान दिले. कदम केवळ एवढ्यावरच थांबले नाहीत तर समांतरला विरोध करणे सोडा; अन्यथा महापौरपद कार्यकाळाच्या वाटणीचा करार मोडून टाकू. भाजपला वर्षभराचे महापौरपद मिळू देणार नाही, असा इशाराही दिला.

समांतरसाठी डीआय की एचडीपीई पाइप या १५३ कोटींच्या व्यवहारावरून युतीत चकमकी सुरू झाल्या आहेत. शनिवारच्या सर्वसाधारण एचडीपीई पाइप वापराचा इतिवृत्तात घुसडलेला प्रस्ताव शिवसेनेने भाजपचा विरोध डावलून मंजूर केला. त्याविरुद्ध भाजपने विभागीय आयुक्तांकडे धाव घेत प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली. या आठवड्याच्या अखेरीस याविषयी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी जाणार आहेत. स्थानिक पातळीवर तापलेल्या या वादात कदम यांनी आज उडी घेतली. एप्रिलमध्ये मनपा निवडणुकीच्या काळात त्यांनी समांतरच्या करारात घोळ झाला. ठेकेदाराकडून गैरमार्गाने पाणीपट्टी वसुली सुरू आहे. त्यामुळे या योजनेची चौकशी करू, असे म्हटले होते. मात्र, सोमवारी पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, मनपाची निवडणूक "समांतर'च्या प्रश्नावर लढली गेली आहे. लोकांना पाणी देण्याचे आश्वासन आम्ही दिले आहे. आज योजना बंद केली तर पुन्हा दिल्लीतून कोणत्याही योजनेला दमडा मिळणार नाही. आरोप करून काही लोकांची फक्त करमणूक होईल. लोकांना काहीही फायदा होणार नाही.

भाजपच्या स्थानिक नेत्यांना तंबी
तत्पूर्वी सकाळी सुभेदारी विश्रामगृहावरील युतीच्या बैठकीत कदम आक्रमक झाले होते. समांतरला विरोध कराल तर करारात ठरलेले एका वर्षाचे महापौरपद मिळणार नाही, असे ते म्हणाले. त्यावर भाजपचे स्थानिक पदाधिकारी अचंबित झाले. आम्ही या विषयावर काहीच बोलू शकत नाही. तुम्ही आमच्या वरिष्ठांशी बोला, असा सूर त्यांनी लावला. जिल्हास्तरीय ६० समित्यांवर सदस्यांची निवड करण्यासाठी त्यांनी युतीची बैठक बोलावली होती. कार्यकर्त्यांची नावे हवी आहेत, असा निरोप देऊन भाजप नेत्यांना सुभेदारीवर बोलावण्यात आले होते. विषय समित्यांवर नियुक्तीचा असला तरी चर्चा समांतरवरच झाली. समांतरला भाजपचा विरोध असल्याच्या बातम्या येत आहेत. भाजपचे लोक माध्यमांकडे का जातात, असा सवाल खैरे यांनी केला आणि हाच धागा धरून कदम यांनी भाजपवर हल्लाच केला. समांतरप्रकरणी विरोधात गेलात तर दीड वर्षानंतर भाजपला महापौरपदाचा करार पाळला जाणार नाही, असे पालकमंत्री म्हणाले.

एकटे पडलो तरी...
समांतर ही शहराची गरज आहे, असे कदम म्हणाले तेव्हा समांतरने अजून पाणी दिले नाही तरीही वसुली का सुरू केली, असा सवाल भाजपच्या नेत्यांनी केला. त्यावर आम्ही सभागृहात एकटे पडलो तरीही समांतर होणारच. काय विरोध करायचा तो करत राहा, असे कदम म्हणाले. तर भाजपवाले समांतरचे वाटोळे करण्यासाठी निघाले आहेत, अशी टिप्पणी खैरे यांनी केली. महापौरपदाचे वाटप वरिष्ठ पातळीवर झाले आहे. तुम्ही त्यांच्याशीच चर्चा करा असे स्पष्ट करून जय महाराष्ट्र म्हणत भाजपचे नेते बैठकीतून बाहेर पडले.