आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद मनपा निवडणूक : प्रभाग राखीव, दिग्गजांना दणका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद मनपाच्या वॉर्ड आरक्षण सोडतीत उपमहापौर, सभापती व सभागृह नेत्यांसह अनेक मातब्बर नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षित झाले. यामुळे मोठ्या अपेक्षेने आलेले हे दिग्गज उतरलेल्या चेहर्‍याने परतले.

संत तुकाराम नाट्यगृहात शनिवारी झालेल्या सोडतीत महापौर कला ओझा यांचा विद्यानगर वार्ड खुला राहिला. उपमहापौर संजय जोशी, स्थायी समितीचे सभापती विजय वाघचौरे, सभागृहनेते किशोर नागरे, माजी महापौर गजानन बारवाल व विकास जैन, माजी सभागृहनेते सुशिल खेडकर, माजी सभापती काशीनाथ कोकाटे, राजू वैद्य व त्र्यंबक तुपे, माजी विरोधी पक्षनेते प्रमोद राठोड व डॉ. जफर खान, माजी उपमहापौर प्रशांत देसरडा, मधुकर सावंत, अमित भुईगळ, मिलिंद दाभाडे, कृष्णा बनकर, असद पटेल या नामी चेहर्‍यांवरील हास्य मावळले.

समर्थनगर वार्ड अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याचे शुक्रवारी सायंकाळी आयोगाकडून आलेल्या पत्रावरून स्पष्ट झाले. त्यामुळे नगरसेवक समीर राजूरकर यांचाही मनपाचा मार्ग बंद झाला. त्यांच्यासाठी अन्य वार्ड नाही. राजू वैद्य यांचे असेच आहे. वाघचौरे, देसरडा यांनाही पाच वर्षाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. खेडकर, तुपे, बारवाल यांना लगतच्या वाॅर्डांत प्रयत्न करावे लागणार आहेत.

खुल्या वार्डांचा ‘भाव’ वधारणार
११३ वार्डांपैकी २९ वार्डांत कोणीही लढू शकतो. वाॅर्ड गेलेले काही जण खुल्या येथून इच्छुक आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा भाव वधारणार आहे. कार्यकर्त्याने उमेदवारीवर दावा न करता आपल्या पाठीशी राहावे यासाठी घाेडेबाजार होईल. पक्षाच्या उमेदवारीसाठीही चुरस सुरू होईल.

भाजप प्रवेश लांबणीवर? : मोदी लाटेचा फायदा घेण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह ७ नगरसेवक भाजपच्या संपर्कात होते. आरक्षणासाठी त्यांचा अधिकृत प्रवेश लांबला होता. यातील पाच जणांचे वार्ड इतर प्रवर्गासाठी राखीव झाल्याने ही मंडळी आता भाजपत जाण्याची शक्यता कमी आहे. तसे एकाने बोलूनही दाखवले.

घोडेले नशिबवान : शिवसेना उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले व माजी महापौर अनिता घोडेले हे दांपत्य नशिबवान ठरले. घोडेले यांचे विटखेडा, नक्षत्रवाडी-कांचनवाडी या परिसरावर वर्चस्व आहे. आता स्वतंत्र वार्ड झालेला विटखेडा ओबीसीसाठी राखीव झाला. तर नक्षत्रवाडी सर्वसाधारण महिलांसाठी खुला आहे. त्यामुळे अनिता घोडेले विटखेडा नक्षत्रवाडी-कांचनवाडी या दोन्हीही वार्डातून लढू शकतात. स्वत: घोडेले विटखेड्यातून लढू शकतात. अनिता त्यांचे दीर आनंद (काँग्रेस) हे घोडेले परिवारातील दोघे सध्या नगरसेवक असून, पुढील पाच वर्षांसाठीही किमान दोन घोडेले सभागृहात असतील, अशी चर्चा आतापासूनच आहे.

राज वानखेडे यांच वार्डही झाला आरक्षित
मनसेचे एकमेव नगरसेवक राजगौरव वानखेडे यांचा वार्डही आरक्षित झाला. बाजुचा एक वार्ड खुला असल्यामुळे त्यांच्याकडे पर्याय आहे.

शहा, दाभाडे, बनकर यांनाही बसला फटका
मुस्लिम वसाहतींचा आवाज मानले जाणारे मुजीब आलम शहा, मीर हिदायत अली, अफसरखान यांचे वॉर्ड आरक्षित झाले. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मिलिंद दाभाडे, कृष्णा बनकर, अमित भुईगळ यांच्यावरही दुसरे वॉर्ड शोधण्याची वेळ आली आहे.

आधी गर्दी नंतर शुकशुकाट
सोडत सुरू होताना नाट्यगृहात पाय ठेवायलाही जागा नव्हती. आरक्षण जाहीर होत गेले तसतशी गर्दी ओसरली. वाॅर्ड आरक्षित झाल्यानंतर हिरेमोड झाल्याने अनेक इच्छूक नेते, त्यांचे समर्थक कार्यकर्त्यांनी सभागृहातून काढता पाय घेतला. त्यामुळे गर्दी ओसरली. उपमहापौर जोशी शेवटपर्यंत थांबले होते. मात्र वार्ड आरक्षित होताच तेही बाहेर पडले. उरलेले २९ वार्ड सर्वांसाठी खुले अशी घोषणा आयुक्तांनी केली तेव्हा सभागृहात १० टक्केच गर्दी होती.

गुलमंडी सर्वांसाठी
शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणारा गुलमंडी वाॅर्ड खुला आहे. येथून कोणीही लढू शकते. येथे आजी-माजी आमदार, खासदार पुत्रांची लढाई होऊ शकते. शिवसेना-भाजप युती न झाल्यास काट्याची टक्कर नक्की आहे.

आरक्षण असे
- नवीन वॉर्ड : ११३ - अनुसूचित जाती: २२ (११ पुरुष, ११ महिला) - एसटी : १ - ओबीसी : ३१ (१५ पुरुष, १६ महिला) - खुले : ५९ (२९ पुरुष, ३० महिला)
बातम्या आणखी आहेत...