आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप-सेनेचा निवडणूक प्रचार सुरू, पण इच्छुकांची धाकधूक शिगेला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एप्रिल महिन्यात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने शिवसेनेबरोबरच भाजप नेत्यांच्या औरंगाबादेतील चकरा वाढल्या आहेत. एमआयएमच्या धास्तीने या दोन्हीही पक्षाने तूर्तास स्वतंत्रपणे प्रचार सुरू केला आहे. दुसरीकडे वाॅर्डांची रचना कशी होते, आरक्षण नेमके कसे राहील यामुळे विद्यमान नगरसेवक तसेच इच्छुकांची धाकधूक मात्र कमालीची वाढली आहे.

लोकसभेत एकत्र लढलेले शिवसेना आणि भाजप हे पक्ष विधानसभेला मात्र एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. त्यात भाजपला मोठे यश आल्याने यापुढे सेनेसोबत लढू नये, असा एक प्रवाह पक्षात असल्याने त्यांनी स्वतंत्रपणे प्रचाराला सुरुवात केली. त्यामुळे शिवसेनेनेही आपली यंत्रणा सर्वच वाॅर्डांत राबवणे सुरू केले. किती वाॅर्ड होतील, आरक्षण काय असेल, रचना कशी असेल, याचा विचार न करता या दोन्हीही पक्षांनी प्रत्येकी ८० वाॅर्डांत प्रचार सुरू केला आहे.

प्रत्येक वाॅर्डात इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे सद्य:स्थितीत प्रचार जोमाने सुरू असल्याचे चित्र असून स्थानिक नेत्यांनीही ते कबूल केले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही जण नाराज होतील तेव्हा कदाचित इतके कार्यकर्ते एकत्रितपणे प्रचार करताना दिसतील की नाही याची शंका असली तरी सध्या मात्र युतीतील दोन्हीही पक्षांचा जोरदारपणे प्रचार सुरू असून येत्या काही दिवसांत याला आणखी गती मिळणार आहे.

वॉर्डातील सदस्य नोंदणीवर भर
प्रत्येक वाॅर्डातील एकूण मतदारसंख्येच्या किमान २५ टक्के सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. त्या माध्यमातून थेट प्रचारही सुरू आहे. वाॅर्ड आरक्षण व रचनेनंतर कोण लढणार हे ठरेल; पण त्यासाठी आम्ही प्रचार थांबवणार नाही. पक्षाचे काम सुरू आहे. नंतर उमेदवारांचा प्रचार सुरू होईल. अतुल सावे, आमदार, भाजप

राज्यस्तरीय नेत्यांच्या चकरा वाढल्या. पण आधीपासूनच नेते, पदाधिकाऱ्यांनी प्रचार सुरू केला आहे. वाॅर्डनिहाय बैठका घेऊन घरोघरी संपर्क साधला जात आहे. आम्ही उमेदवार न बघता पक्ष म्हणून करतो. त्यामुळे प्रचार केव्हाच सुरू झालाय.
अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख.