आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप जमिनीवर, आता म्हणतात, युती हवीच! दिल्ली विधानसभेच्या दणक्याने बदलली भाषा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढून राज्यातील क्रमांक एकचा पक्ष झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिका-यांनीही महानगरपालिकेत स्वबळाची भाषा चालवली होती. शिवसेनेला तुच्छ लेखत ही मंडळी कामालाही लागली होती. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेचा फुगा फुटला अन् रात्रीतून स्थानिक कार्यकर्त्यांची भाषाच बदलली. एमआयएमला रोखण्यासाठी युती व्हायला हवी, अशी संयमी भाषा मंगळवारपासून सुरू झाली आहे.

महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली नसल्याने युतीबाबत चर्चाही सुरू झाली नव्हती. वाॅर्ड आरक्षण तसेच रचना जाहीर झाल्यानंतर ही प्रक्रिया सुरू होईल, असे सांगितले जाते. वाॅर्ड रचना आणि आरक्षण एकाच वेळी समोर आले. त्यामुळे आता चर्चा सुरू होईल, अशी अपेक्षा असतानाच सातारा देवळाईचा महानगरपालिकेत समावेश करण्याचे ठरले. त्यासाठी कदाचित महानगरपालिका बरखास्त करून निवडणूक पुढे ढकलली जाईल, असे संकेत मिळत आहेत. शहरात सातारा-देवळाईचा महापालिकेत समावेशाचा निर्णय आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी या दोनच विषयांवर राजकीय गप्पांचा फड रंगला होता.
आता युतीची भाषा : मंगळवारी दिल्ली विधानसभेचा निकाल लागला. यात देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला मतदारांनी साफ नाकारले. मोदी लाटेवर स्वार असलेल्या या पक्षाला ७० पैकी अवघ्या ३ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे स्थानिक पातळीवर स्थानिकांना सन्मान दिला तरच विजय मिळवता येतो, याचा साक्षात्कार स्थानिक पदाधिकाऱ्यांना झाला अन् महानगरपालिका निवडणुकीत युती हवीच अशी मागणी खासगीत बोलताना सुरू झाली.
दरम्यान, युतीची अजून चर्चा झाली नव्हती तरी औरंगाबाद दौऱ्यावर असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे युती केलेलीच बरी, असा सल्ला भाजपला दिला होता, तर युतीचा निर्णय आमचे नेते ठरवतील, असे भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी म्हटले होते. त्यामुळे युती करायची की नाही, हा निर्णय सर्वस्वी भाजपच घेणार हेही स्पष्ट होते.
जोरदार दणका
दिल्लीत केजरीवालांनी भाजपला जोरदार दणका दिल्यामुळे भाजप आता युतीला तयार होईल, असे भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी खासगीत बोलताना म्हणत आहेत. एकूणच पालिका निवडणुकीत शिवसेनेला मान दिला जाईल, असे संकेत मिळत आहेत.