आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निश्चिंत झालेले इच्छुक पुन्हा अस्वस्थ, आरक्षण नव्याने होणार की जुनेच राहणार?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सातारा व देवळाई या दोन गावांचा औरंगाबाद महानगरपालिकेत समावेश होणार हे मंगळवारी स्पष्ट झाले अन् निवडणुकीच्या आखाड्यात शड्डू ठोकण्याची तयारी करीत असलेल्या अनेकांच्या मनात पुन्हा धडकी भरली आहे. नवा परिसर हद्दीत येत असल्याने वाॅर्डांची संख्या वाढणार हे नक्की आहे.
तसे झाल्यास आरक्षण सोडत नव्याने होते की नवीन वाॅर्डांसाठी स्वतंत्र सोडत होईल, हे अजूनही अस्पष्ट आहे. गत आठवड्यात वाॅर्ड आरक्षण सोयीप्रमाणे मिळाल्याने निश्चिंत झालेली काही मंडळी आता अस्वस्थ झाली आहे, तर काहींना वॉर्ड आरक्षण नव्याने झाल्यास आपले नशीबही बदलेल, अशी अपेक्षा वाटू लागली आहे.
गत आठवड्यात महानगरपालिकेच्या ११३ वॉर्डांची आरक्षण सोडत काढण्यात आली. त्याचा फटका अनेक दिग्गजांना बसला. मात्र, अनेक जण आनंदितही झाले. कारण त्यांच्या सोयीनुसार वाॅर्ड आरक्षित झाले होते. काहींचे वाॅर्ड विविध प्रवर्गाताली महिलांसाठी आरक्षित झाल्याने त्यांनी घरच्यांसाठी तयारी सुरू केली. वाॅर्ड रचना, विधानसभेची मतदार यादी तपासणे हे काम सुरू झाले. हक्काचे मतदार किती आहेत, अडचणीचे कोण ठरू शकते, याचा अभ्यास सुरू असतानाच सातारा व देवळाई या दोन गावांची मिळून होणारी नगर परिषद रद्द होऊन या दोन्हीही गावांचा समावेश पालिका हद्दीत होणार ही बातमी झळकली. दुसऱ्याच दिवशी ही बातमी अधिकृतही झाली. तेव्हा सर्वांनीच उपस्थित केलेला मुद्दा चिंतेचा तसेच आनंदाचा ठरला. तो म्हणजे वाॅर्ड आरक्षण सोडत नव्याने होणार का?
संधी जाण्याची भीती-
नव्याने वाॅर्ड आरक्षण झाले म्हणजे विद्यमान आरक्षणानुसार मिळालेली अनेकांची संधी जाणार हे स्पष्ट आहे. नव्या आरक्षणात कोणताही वाॅर्ड कोणासाठीही आरक्षित होऊ शकतो. जुन्या आरक्षणात मिळालेली संधी नव्या आरक्षणात गमावली जाऊ शकते, अशी भीती अनेकांना आहे. दुसरीकडे नव्याने आरक्षण झाले तर पुन्हा संधी मिळू शकते, असे सध्या वाॅर्ड आरक्षित झालेल्या मातब्बरांना वाटत आहे. त्यामुळेच आरक्षण नव्याने की फक्त साताऱ्यातील वाॅर्डांचीच आरक्षण सोडत होणार यावर जोरदार चर्चा सुरू आहे.
चित्रही बदलेल, नशीबही बदलेल
वाॅर्ड आरक्षित झाल्यानंतर काहींनी दुसऱ्या वाॅर्डात शोधाशोध सुरू केली होती. त्यातील काहींना उमेदवारी मिळेल, अशीही चिन्हे होती. मात्र, अनेकांना पाच वर्षे थांबल्याशिवाय पर्याय नव्हता. आरक्षण सोडत झाली तेव्हा नशिबाने दगा दिला, असे काही जण म्हणत होते. आता हीच मंडळी चित्रही बदलेल अन् नशीबही बदलेल, असा आशावाद ठेवून आहेत.