आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयएमच्या धसक्याने \"सोलापूर पॅटर्न\'ची मागणी, विजयानंतरच पक्षप्रवेश करण्याचा घेतला निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विधानसभेत सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेसने एमआयएम या नव्या पक्षाची कमालीची धास्ती घेतली आहे. सैरभैर असलेल्या काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवकांनी महानगरपालिका निवडणुकीत अपक्ष लढण्याचा सोलापूर पॅटर्न राबवावा, अशी सूचना वरिष्ठांकडे केल्याचे समजते.
एमआयएमच्या झेंड्याखाली एक समाज मोठ्या प्रमाणावर एकवटला आहे. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस तसेच राष्ट्रवादी इतर पक्षांना मतदान करायची नाही, ही विधानसभा निवडणुकीतील एकी या वेळीही कायम राहिल्यास अडचण होणार हे स्पष्ट असल्याने अपक्ष म्हणून लढल्यास स्वबळावर जिंकण्याची थोडीफार का असेना शक्यता आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी वरिष्ठांकडे अशी मागणी केल्याचे समजते.
काय आहे सोलापूर पॅटर्न
सोलापूरमध्ये दहा वर्षांपूर्वी काँग्रेसचे उमेदवार अपक्ष लढले होते. विजयानंतर त्यांनी रीतसर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हाही काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील की नाही, अशी शंका होती. त्यामुळे ते अपक्ष म्हणून लढले होते. तोच पॅटर्न एमआयएमच्या धसक्याने औरंगाबादेत राबवावा, असा आग्रह आहे.

दिल्लीसारखी अवस्था झाली तरी चालेल
दिल्लीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. महानगरपालिकेत दिल्लीसारखी अवस्था झाली तरी चालेल, पण आमचे उमेदवार पंजावरच लढतील. एमआयएमची धडकी घेण्यासारखे काहीही नाही. सिल्लोडमध्ये असाच फुगा फुगवण्यात आला होता, पण तरीही येथे काँग्रेसच सत्तेवर आली. त्यामुळे सोलापूर, कोल्हापूर, सातारा वगैरे पॅटर्न आम्ही राबवणार नाहीच. ज्यांना भीती वाटते त्यांनी काँग्रेस सोडून लढावे. अपक्ष लढण्याचा ज्याचा त्याचा अधिकार, पण आम्ही पंजावरच लढणार. अब्दुलसत्तार, आमदारतथा पालिका निवडणूक प्रभारी.
असा होईल फायदा
काँग्रेसकडून लढल्यास मुस्लिमबहुल पट्ट्यातील मतदार पंजा किंवा राष्ट्रवादीच्या घड्याळाला मतदान करणार नाही. त्यापेक्षा अपक्ष म्हणून लढल्यास दुसरे चिन्ह असेल. त्यामुळे वैयक्तिक संबंध, नातीगोती या जोरावर मते मिळवणे सोपे जाईल, असे काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवकांना वाटते.

महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतरची पहिली निवडणूक १९८८ मध्ये झाली. या वेळी कोणीही पक्षाच्या चिन्हावर लढले नव्हते. अपक्ष म्हणून सर्वजण लढले आणि विजयानंतर ते एकत्र आले होते.