आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठकीनंतर पाडापाडीचे नियोजन, अपक्षांचा गट तयार करण्याच्या हालचाली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओरंगाबाद- सोमवारी सकाळी शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीच्या स्थानिक नेत्यांमध्ये बंडखोरी शमवण्यासाठी मोठी बैठक झाली. बंडखोरांच्या वाॅर्डांत संयुक्त प्रचार करण्याचे ठरले. तेथून ही मंडळी परतली अन् लगेच वेगवेगळ्या बैठका घेऊन समोरच्याचे उमेदवार कसे पाडता येतील, याचे नियोजन करण्यात आल्याचे समोर आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या बंडखोरांना ऐनवेळी रसद पुरवण्याचेही नियोजन करण्यात आले. एका नेत्याने तर अजून निवडूनही आलेल्या अपक्षांचा स्वतंत्र गट तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.


स्थानिकांची इच्छा नसतानाही युती झाल्याने दोन्हीही पक्ष आपलेच जास्त नगरसेवक कसे निवडून येतील, याच्या कामाला लागले आहेत. मात्र, आपले जास्त निवडून येत नसतील तर समोरच्याचेही जास्त येता कामा नये, ही नीती दोन्हीही पक्षांनी अंगीकारल्याचे दिसून येते. त्यामुळे बंडखोरी झालेल्या २१ वाॅर्डांत मोठे घमासान सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मंगळवारी शिवसेनेच्या बंडखोरांसोबत एका नेत्याने बैठक घेऊन माघार घेण्याचा प्रश्नच नाही. काही मदत लागली तर सांगा, असे स्पष्ट 'आदेश' दिल्याचे समजते. तिकडे भाजपच्या नेत्यानेही शिवसेनेला चकवा द्या, अशा सूचना केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी म्हटले आहे.

युतीमध्ये ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक असतील त्यांचा महापौर होईल, हे स्पष्ट आहे. सत्ता आपलीच येणार हे दोन्हीही पक्ष ठामपणे सांगतात. सत्ता आपलीच तेव्हा महापौर आपल्याच पक्षाचा व्हायला हवा, यासाठी दोन्हीही पक्षाचे नेते इरेला पेटले आहेत. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या वतीने काही अपक्षांना रसद पुरवण्यात येत असून त्याची जबाबदारी एका नेत्यावर सोपवण्यात आली आहे. शिवसेनेच्या वतीने आर्थिक रसद पुरवण्यात आली नसली तरी कार्यकर्त्यांची फौज उपलब्ध करून देण्यात आली आहे.

१५ बंडखोर निवडून येण्याची शक्यता
एमआयएमचाप्रभाव असलेले वाॅर्ड सोडून ८५ ते ९० वाॅर्डांत, जेथे युतीचे प्राबल्य असल्याचे बोलले जाते, अशा वॉर्डांतून किमान १५ बंडखोर निवडून येतील, अशी अनेकांची अटकळ आहे. २१ ठिकाणी बंडखोरी झाली. त्या सर्वच बंडखोरांच्या मागे कोणी ना कोणी ताकद लावून उभा असल्याचेही दिसून येते.

अपक्ष निवडून आणण्याचे नियोजन
दरम्यान,एका नेत्याने आतापासूनच अपक्ष नगरसेवकांचा गट गठित करण्याची तयारी चालवली असून निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन सुरू आहे. आर्थिक मदतही देण्यात येत असल्याचे समजते. पालिकेत राजकारण करायचे असेल तर एक गट हाताशी हवा म्हणून आतापासूनच ठरवून काही अधिकृत उमेदवारांना पाडून अपक्ष निवडून आणण्याचे नियोजन करण्यात येत आहे.