आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा निवडणूक स्वबळावर लढण्याची भाजपची तयारी सुरू,मतांची फाटाफूट रोखणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबाद महापालिकेची आगामी निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. त्यासाठी एका बूथवर 200 प्राथमिक सदस्य नियुक्त टार्गेट ठरविण्यात आले असून मतदारापर्यंत थेट पोहोचत प्रचारासाठी दर रविवारी वॉर्डनिहाय सफाई अभियान राबवले जाणार आहे. सोमवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या संदर्भात आखणी करण्यात आली.

विधानसभेप्रमाणेच मनपातही स्वतंत्र लढण्यासाठी मोर्चेबांधणी करा, असे स्पष्ट संदेश मुंबईतून देण्यात आले आहेत. त्यामुळे सोमवारी तातडीने बैठक आयोजित करण्यात आली होती. उस्मानपुरा येथे पक्षाच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीस आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष बापू घडामोडे, माजी महापौर डॉ. भागवत कराड, माजी आमदार किशनचंद तनवाणी आणि प्रशांत देसरडा यांची प्रमुख उपस्थिती होती.
ताकद दाखवून देऊ : विधानसभा निवडणुकीचे बूथनिहाय मतदान पाहिले तर अनेक वॉर्डांमध्ये भाजपची ताकद वाढली असल्याचे लक्षात येते, असे मत व्यक्त करण्यात आले. या ताकदीचा वापर महापालिका निवडणुकीत योग्य पद्धतीने करण्यासाठी प्रभावी यंत्रणा आवश्यक असल्याचे मत तनवाणी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, हिंदुत्ववादी मतांची फाटाफूट हा प्रमुख मुद्दा आहेच. त्यासोबत भाजपच्या हक्काच्या मतदाराला मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणारी ताकदवान यंत्रणा उभी करण्यावर भर द्यावा लागणार आहे. आमदार सावे यांनी संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याची तयारी सुरू करावी, असे सांगितले.
बूथवर 200 सदस्य नोंदवणार
शहरातील प्रत्येक बूथवर 200 प्राथमिक सदस्य नोंदविण्याची सूचना पदाधिकारी आणि नगरसेवकांना देण्यात आली. गेल्यावेळी युती असताना भाजपच्या वाट्याला 27 तर शिवसेनेच्या वाट्याला 48 जागा होत्या. मुस्लिमबहुल वॉर्डात युतीचा उमेदवारच नव्हता. यंदा सर्व वॉर्डात भाजपला ताकदीचे उमेदवार लागणार आहेत. त्यादृष्टीने विचार करण्याचेही सांगण्यात आले.
स्वच्छता मोहीम
मनपा निवडणुकीच्या प्रचाराचा एक भाग म्हणून कोणते उपक्रम राबवावेत, यावरही बैठकीत चर्चा झाली. तेव्हा रविवारी मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांना सुटी असते. त्यामुळे अनेक ठिकाणी कचरा देखील साचतो. याबाबत नागरिकांच्या तक्रारी येतात. ही बाब लक्षात घेऊन वॉर्डात पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम राबवावा. त्याची तातडीने सुरुवात करावी, असे बजावण्यात आले.