आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा निवडणुकीत राष्ट्रवादीचाही ‘एकला चलो रे’चा सूर !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विधानसभा निवडणुकीत तुटलेली काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आता औरंगाबाद मनपा निवडणुकीतही जुळणे अवघड वाटत आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यकर्ते पदाधिका-यांचे मत जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने बैठकीचे आयोजन केले असून कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा असेल तर स्वबळावर लढणे आवश्यक असल्याचा सूर राष्ट्रवादीत उमटत आहे.
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात केवळ 13 टक्के मते घेणाऱ्या राष्ट्रवादीसमोर घटत्या जनाधाराची चिंता आहे. विधानसभेला जिल्ह्यातील केवळ चार मतदारसंघांत पक्षाची सन्मानजनक स्थिती राहिली. केवळ एक आमदार निवडून आला कन्नडमध्ये निसटत्या फरकाने पराभव झाला. हीच एकमेव जमेची बाजू आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत डावपेच आखण्यासाठी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे मत जाणून घेणार आहे. महापालिकेच्या २०१० च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली होती. राष्ट्रवादीच्या वाट्याला केवळ 30 जागा आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता. त्यात राष्ट्रवादीने अकरा िठकाणी विजय मिळवला होता.
शहरामधील राष्ट्रवादीचे अनेक मुस्लिम नगरसेवक एमआयएमच्या गळाला लागल्याने मुस्लिम समाजातील गमावलेला जनाधार पुन्हा कसा मिळवायचा अशी स्थिती आहे. विधानसभेला राष्ट्रवादी गटनेता अफसर खान यांनी समाजवादी पार्टीची उमेदवारी घेतली होती.
विधानसभेला राष्ट्रवादीने शहरातील तिन्ही मतदारसंघांत अनामत रक्कम गमावलेली आहे. त्यामुळे केवळ मुस्लिमच नव्हे तर शहरातील विविध घटकांमध्येच जनाधार घटल्याची प्रचिती आली. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार विनोद पाटील यांची स्थिती काही प्रमाणात बरी होती असे म्हणता येईल. इतर दोन मतदारसंघांत पक्ष साफ झोपला. औरंगाबाद पश्चिममध्ये राष्ट्रवादीला इतर पक्षांतील उमेदवार आयात करावा लागला. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला सोडचिठ्ठी देणारे कदीर मौलाना यांच्यामुळे राष्ट्रवादी परिणाम काही प्रमाणावर भोगावे लागले.
केंद्र राज्यात आघाडीचे सरकार असताना आैरंगाबाद मनपात आघाडी ठोस असे काही काम करू शकली नाही. त्यामुळे आता भाजप सरकार असताना कुठल्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार हा प्रश्न आहे. समांतर मलनिस्सारण प्रकल्पासाठी तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवारांनी मदत केल्याचा प्रचार राष्ट्रवादी करीत असली तरी त्याचे म्हणावे तसे भांडवल करता आलेले नाही.
एमआयएम अपयशी ठरेल
मनपानिवडणुकीत एमआयएमचा प्रभाव निष्प्रभ ठरेल. विधानसभेला भावनिकतेच्या पाठीशी गेलेल्या मुस्लिम समाजाला चूक लक्षात येईल. सत्ता नसलेल्या एमआयएमचे पदाधिकारी कुठून कामे मंजूर करून आणतील? राज्यात राष्ट्रवादीचे आमदार एक दबाव गट निर्माण करू शकतील. मुश्ताकअहेमद, शहराध्यक्ष,राष्ट्रवादी.
स्वबळाची तयारी
मनपानिवडणूक स्वबळावर लढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा दबाब वाढत आहे. स्वबळावर लढण्याइतके 99 उमेदवार पक्षाकडे आहेत. पदाधिका-यांची भूमिका समजून घेण्यासाठी पुढील आठवड्यात राष्ट्रवादीने बैठकीचे आयोजन केले आहे. अभिजितदेशमुख, नगरसेवक,राष्ट्रवादी.