आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उणे-दुणे काढण्यातच गुरफटले पालिकेचे कर्तेधर्ते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे महानगरपालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक सध्या आपसातील उणे-दुणे काढण्यातच अडकले असल्याचे दिसून येते. एकमेकांविरोधात कायम भांडणाऱ्या या दोन पक्षांतील पदाधिकारी सद्य:स्थितीत स्वपक्षाच्याच विरोधात कामाला लागल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांपासून दोन्हीही पक्षांत याचीच चर्चा आहे. त्यामुळे महानगरपालिका वर्तुळात सध्या विकास कामांची नव्हे तर फक्त पद कोणाला नि कसे मिळणार, याचीच चर्चा सुरू आहे. कोणत्या नेत्याकडे गेले म्हणजे पद मिळेल किंवा टिकेल, याचाही सल्ला दिला जात आहे.
महापौर त्र्यंबक तुपे यांनी राजीनामा द्यावा यासाठी सेनेतील एक गट कामाला लागलेला आहे. दुसरीकडे, महापौरपदावर बसण्यासाठी भाजपमधील इच्छुक आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्याचा ‘गेम’ करण्यासाठी सज्ज झाले आहेत. आपल्या पक्षाचा महापौर जास्त दिवस राहू नये, अशी काही शिवसैनिकांची इच्छा, तर आपल्या गटाचा कार्यकर्ता महापौर होणार नसेल तर शिवसेनेचाच महापौर राहिलेला अधिक चांगला, असे संघ कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. करारानुसार, विद्यमान महापौर-उपमहापौरांनी राजीनामा द्यावा यावर दोन्ही पक्षांत अजून चर्चेस सुरुवात झालेली नाही. परंतु काही महिने आधीपासूनच पक्षांतर्गत खदखद वाढत चालली आहे.

पुढील एक वर्षासाठी महापौरपद भाजपकडे जाणार आहे. या पदावर आपल्यालाच संधी मिळावी यासाठी भाजपच्या इच्छुकांनी सहा महिने आधीपासूनच ‘फील्डिंग’ लावली होती. तेव्हापासून काही जण एकमेकांचे उणे-दुणे काढत होते. अलीकडे यात वाढ झाली आहे. या पदासाठी इच्छुक असलेले नगरसेवक स्थानिक नेत्यांपासून ते प्रदेशाध्यक्षांपर्यंत वारंवार चकरा मारत आहेत. हे पद आपल्याला किंवा आपल्या गटाच्या कार्यकर्त्याला मिळणार असेल तर ठीक; अन्यथा ते शिवसेनेकडेच राहिलेले चांगले, असे अनेकांचे मत आहे. त्यामुळे उमेदवारीत मी किंवा आपल्या गटाचा कार्यकर्ता कसा सरस आहे, हे दाखवण्याच्या प्रयत्नात आपल्याच पक्षाच्या नगरसेवकाची बदनामी होते, याचे भान नगरसेवकांना राहिलेले नाही.

शिवसेनेतही तसेच आहे. तुपे कधी पदावरून दूर होतात, याकडे एका मोठ्या गटाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे ३१ ऑक्टोबरपूर्वीच तुपेंनी राजीनामा द्यावा अन् युतीचा धर्म पाळावा, असे जाहीरपणे सांगितले जात आहे. उपमहापौरपद पुढील एक वर्षासाठी सेनेकडे असेल. या पदावर विराजमान होण्यास फारसे कोणी इच्छुक नाही. कारण आता उपमहापौर झालो तर पुढील अडीच वर्षांसाठी महापौर होण्याची संधी जाईल, असे अनेकांना वाटते. पुढील अडीच वर्षांसाठीचे महापौरपदाचे आरक्षण अजून जाहीर झालेले नाही. त्यामुळे अनेक जण द्विधा मन:स्थितीत आहेत. महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले असते तर येथेही राजकारण सुरू झाले असते. तरीही संभाव्य इच्छुकांकडून फील्डिंग लावली जात असून येथेही भाजपसारखेच चित्र आहे. महापौर-उपमहापौर राजीनामा देतील, त्यानंतर हे वैयक्तिक उणे-दुणे काढणे आणखी वाढेल, यात शंका नाही. सध्या पक्षातील कार्यकर्तेही याशिवाय दुसऱ्या मुद्द्यावर चर्चा करत नाहीत.
बातम्या आणखी आहेत...