आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Municipal, Latest News In Divya Marathi

मनपाच्या पथकाची दादागिरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मालमत्ता करवसुलीसाठी खासगी सावकारालाही लाज वाटेल अशी दादागिरी मनपाच्या पथकांनी सुरू केली आहे. पथकाने चक्क केंद्र सरकारच्या निलीट या कार्यालयाला कर भरूनही सील ठोकले. एवढेच नव्हे तर सहसचिव दर्जाच्या या निलीट संस्थेच्या संचालकांनाही शिवीगाळ केल्याचा संतापजनक प्रकार घडला.
विद्यापीठ परिसरात केंद्र सरकारच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (निलीट) म्हणजेच पूर्वार्शमीच्या सीईडीटीची इमारत आहे. निलीटला 3 लाख 42 हजार 482 रुपयांच्या मालमत्ता करवसुलीसाठी नोटीस बजावण्यात आली होती. ही रक्कम भरण्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदत असतानाही ‘आज आत्ता ताबडतोब’ अशी दादागिरीची भाषा करीत वॉर्ड ‘अ’च्या करवसुली पथकाने कर्मचार्‍यांना अर्वाच्य भाषा वापरत कार्यालय सील करण्याची धमकी दिली. त्यानंतर कार्यालयाने 3,42, 482 रुपयांचा धनादेश दिला. कहर म्हणजे याउपरही 20 जणांच्या या पथकाने उपअभियंता केशव वैश्य आणि कॉम्प्युटर प्रोगामर वाय. ए. खान यांच्या लॅबला सील केले व धनादेश घेऊन पथक गेले. ही कारवाई करताना त्यांनी कार्यालयातील कर्मचार्‍यांना अक्षरश: धक्के देत बाहेर काढले. कहर म्हणजे मनपाने धनादेश बँकेत टाकून तो वटवलादेखील. पण आजपावेतो दोन दालनांचे सील उघडले नाही.
3 लाख 42 हजारांची थकबाकी वसूल करायला आलेल्या पथकाने त्याच रकमेचा चेक घेतल्यावर दोन दालने सील करताना त्यावर 12 लाख 33 हजार 480 रुपये आणि 8 लाख 91 हजार रुपये या रकमांच्या थकबाकीसाठी सील करत असल्याचे नमूद करणार्‍या नोटिसा चिकटवल्या. ही रक्कम कशाची याचे काहीच उत्तर मनपाने दिले नाही. शुक्रवारी मनपाची 20 जणांची टोळी गेली तेव्हा निलीट संचालक डॉ. रंजन माहेश्वरी कार्यालयात होते. त्यांनी पथकाला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही शिवीगाळ केली.
आयुक्तांचेही फोन घेतले नाहीत
मंगळवारी निलीटच्या संचालकांचे स्वीय सचिव यू. एम. जोशी व इतर अधिकार्‍यांनी मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा धक्कादायक प्रकार घातला. त्यावर आयुक्तांनी करवसुली विभागाचे प्रमुख शिवाजी झनझन यांना फोन लावला. झनझन यांनी त्यांचेही फोन घेतले नाहीत. अखेर आयुक्तांनी आपण स्वत: यात लक्ष घालून सील काढायला सांगू, असे सांगितले. प्रत्यक्षात मंगळवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सील काढण्यात आले नव्हते.
करवसुली करूनही केंद्र सरकारच्या कार्यालयाला सील