औरंगाबाद- समांतर जलवाहिनी प्रकल्प राबवणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने आता शहरात येणाऱ्या प्रत्येक थेंबातून उत्पन्नाचे गणित सुरू केले आहे. टँकरचे धोरण जाहीर करताना मनपाने ठरवून दिलेले दरच लावले जातील, असे सांगतानाच खासगी टँकरचालकांनाही ६७ रुपये प्रतिकिलो लिटर दराने पाणी विकण्यात येईल, असे जाहीर केले आहे. एवढेच नव्हे तर अग्निशामक दल वगळता मनपालाही पाणी विकतच घ्यावे लागणार आहे.
1 सप्टेंबरपासून औरंगाबादची पाणी योजना
समांतर जलवाहिनीचे काम पाहाणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आल्यानंतर टँकर पुरवठ्याबाबत घोळ झाले होते.
नोंदी व पुरवठा यातील गोंधळ संपल्यावर टँकर पुरवठा सुरळीत झाला असला तरी कंपनीने टँकर धोरण स्पष्ट केले नव्हते. ते आज कंपनीने जाहीर केले. त्यात टँकरचे दर जाहीर करण्यात आले आहेत व टँकर बुकिंग संदर्भात देऊ करण्यात आलेल्या सुविधांबाबत माहिती देण्यात आली आहे.
असे करू शकता बुकिंग
मनपाच्या सहाही वॉर्ड कार्यालयांत असलेल्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या कार्यालयात मंजुरीचे पत्र व ओळखपत्राची प्रत सादर करून टँकरसाठीचा फॉर्म भरून द्यावा लागेल. मनपाचा ग्राहक असल्याची खात्री करून घेतल्यावर डिमांड नोट निघेल व त्यानंतर पैसे भरून पावती दिली जाईल. सध्या ग्राहकाला टँकरची पावती घेऊन टाक्यांवर जावे लागते. आता लवकरच ही प्रक्रिया ऑनलाइन होणार असून त्यामुळे ग्राहकांचा फेरा वाचेल असा कंपनीचा दावा आहे.