आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- मनपा विरोधी पक्षनेता बदलण्याच्या हालचालींना वेग आला आहे. दोन दिवसांत नवीन विरोधी पक्षनेता ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विद्यमान विरोधी पक्षनेता डॉ. जफर खान यांना पक्षर्शेष्ठींनी राजीनामा मागितला आहे. परंतु आठ दिवसांपासून पद वाचवण्यासाठी ते वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करत आहेत.
प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी 4 एप्रिल 2013 रोजी रावसाहेब गायकवाड यांना मनपा विरोधी पक्षनेतेपदाचे नियुक्तिपत्र दिले. गायकवाड यांनी ते पत्र स्थानिक पदाधिकार्यांना देऊन दोन महिने उलटले. अद्यापही विरोधी पक्षनेतेपदाचा पेच कायम आहे. स्थानिक पदाधिकार्यांशी चर्चा करून दोन दिवसांत तिढा सुटणार असल्याची माहिती शहराध्यक्ष सय्यद अक्रम यांनी 14 एप्रिल रोजी ‘दिव्य मराठी’ शी बोलताना दिली होती. तो निर्णयही हवेत विरला. विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत वादाला तोंड फुटले असून गायकवाड यांच्या नियुक्तीलाही विरोध होत आहे.
प्रदेशाध्यक्षांसह निरीक्षकांच्या आदेशाला आव्हान
प्रदेशाध्यक्ष ठाकरेंनी गायकवाड यांना अडीच महिन्यांपूर्वी दिलेल्या नियुक्तीला आणि औरंगाबादचे पक्षनिरीक्षक सचिन सावंत यांनी मागितलेल्या राजीनाम्याला विद्यमान विरोधी पक्षनेता डॉ. जफर खान यांनी आव्हान दिले आहे. डॉ. खान पद वाचवण्यासाठी चार दिवसांपासून दौर्यावर आहेत.
शिवसेना खासदार खैरेंचाही गायकवाड यांना विरोध
खासदार चंद्रकांत खैरे यांचा मुलगा ऋषिकेश खैरे यांचा पराभव करून गायकवाड (नक्षत्रवाडीतून) नगरसेवक झाले आहेत. त्यामुळे गायकवाड यांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये, यासाठी खैरे जोरदार प्रयत्न करत आहेत, असा सूर काँग्रेसचे नगरसेवक आळवत आहेत.
दोन दिवसांत निर्णय
4काँग्रेस पदाधिकार्यांची शुक्रवारी मुंबईत बैठक झाली असून, विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय येत्या दोनच दिवसांत घेतला जाईल. सचिन सावंत, पक्षनिरीक्षक
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.