औरंगाबाद- पोलिसांना माहिती देत असल्याच्या संशयावरून चौघांनी 35 वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह पुरून टाकल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. मजाज खान (35, रा. आसेफिया कॉलनी) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. सिरियल किलर इम्रान मेहदीने केलेल्या खुनाची हुबेहूब पद्धत या आरोपींनी अवलंबली आहे. मृत युवक, चार आरोपी आणि मेहदी सर्व जण आसेफिया कॉलनीतील रहिवासी आहेत.
मारेकरी आणि मजाज आसेफिया कॉलनीतील रहिवासी आहेत. मजाज हा ९ ऑक्टोबर रोजी घराजवळ उभा होता. रिक्षाचालक मज्जू व माजिद या दोघांमध्ये पैशावरून वाद झाला.
दरम्यान, मजाज खानने भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केली. पण भांडण झाल्याची माहिती तो पोलिसांना देतो असा त्याच्यावर संशय होता. त्यामुळे काही वेळेनंतर शेख जावेद ऊर्फ बबलू, शेख अमजद, शेख सोहेल ऊर्फ गुड्डू व शेख असद या चौघांनी मजाजला बळजबरीने खाम नदीच्या काठावर नेऊन मारहाण केली. मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी चौघांनी शक्कल लढवली आणि नदीकाठीच त्याचा मृतदेह पुरला.
आपला भाऊ रात्रीपासून बेपत्ता झाला म्हणून रयाज अहमद खान याने शोधाशोध केली. बबलू व त्याच्या एका साथीदाराने मजाजचे अपहरण केल्याची माहिती त्याला मिळाली. त्याने बेगमपुरा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी शनिवारी बबलू, शेख सोहेल, शेख अमजद आणि शेख असद या चौघांची कसून चौकशी केली. त्यांनी खून करून मृतदेह पुरल्याची कबुली दिली. घटनेचे वृत्त मृताच्या कुटुंबीयांना कळताच ते बेगमपुरा पोलिस ठाण्यासमोर गेले. त्यांच्या पाठोपाठ आसेफिया कॉलनीतील अन्य लोकही आले. ठाण्यासमोर मोठा जमाव जमला. पोलिसांनी मारेकऱ्यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. आरोपींना अटक केल्यानंतर संतप्त जमाव शांत झाला.
असा झाला खून
सात ऑक्टोबर रोजी आसेफिया कॉलनीत एक लग्न होते. तेथे 500 रुपये उसनवारीच्या कारणावरून मज्जू आणि माजिद यांच्यात हणामारी झाली होती. हे भांडण मजाजने मध्यस्थी करून सोडवले. मजाज पोलिस मित्र असल्याचा संशय आरोपींना होता. याच कारणावरून 9 ऑक्टोबरच्या रात्री साडेआठ वाजता त्याचे अपहरण केले.