आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad New Commissioner Shocked After Visit Office

रद्दी, फायलींचे गठ्ठे पाहून मनपा आयुक्त झाले अवाक् !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जागोजागी रद्दी, फायलींचे अस्ताव्यस्त गठ्ठे, वापरात नसलेले संगणक, चिल्लर कामासाठी शहराच्या दुसऱ्या टोकापासून येणारे नागरिक हे चित्र पाहून नवीन मनपा आयुक्त पी. एम. महाजन अवाक् झाले.

कार्यभार स्वीकारल्यानंतर महाजन यांनी प्रथमच मनपाच्या मुख्यालयाचा फेरफटका मारला. इमारत क्रमांक तीनमधील कार्यालयांची अवस्था पाहून ते व्यथित झाले. तेथील फायली, गठ्ठे आणि त्यांची अवस्था त्यांनी पाहिली. प्रशासकीय विभागातील कमोडसारख्या बनलेल्या भंगार खुर्च्या पाहून तर आयुक्त जाम वैतागले. या सगळ्या खुर्च्या फेकून द्या, अशा सूचना त्यांनी केल्या. करआकारणी विभागात त्यांना काही नागरिक भेटले. त्यांच्या कामांबाबत चौकशी करून एवढ्या कामासाठी थेट इकडे का येता? असे विचारले असता शहर अभियंता एस. डी. पानझडे यांनी सगळी कामे येथेच होतात, असे सांगितले. त्यावर आयुक्तांनी ही कामे त्या त्या वॉर्ड कार्यालयांत झाली पाहिजेत, अशा सूचना दिल्या.

आयुक्तांनी समांतरच्या ग्राहक सेवा केंद्रालाही भेट दिली. तुमचे स्वतंत्र गाळा घेऊन कार्यालय का नाही? अशी विचारणा करताच त्यांच्यासोबतचे इतर अधिकारी गोरेमोरे झाले. मनपानेच मुख्यालय व इतर वाॅर्ड कार्यालयांत समांतरच्या ग्राहक सेवा केंद्रांना मोफत जागा दिली आहे. यानंतर त्यांनी नगररचना विभागात ठिय्या देत तासभर माहिती जाणून घेतली. शिरीष रामटेके यांच्याकडून त्यांनी अडकलेल्या फायलींची माहिती घेतली.

अधिकारी गायब
सकाळी ११ वाजता आयुक्तांनी भेटीचा दौरा सुरू केला तेव्हा एकही वरिष्ठ अधिकारी जागेवर नव्हता. शहर अभियंता सखाराम पानझडे यांना फोन गेल्यावर ते लगबगीने दाखल झाले. नगररचना सहसंचालक डी. पी. कुलकर्णी कार्यालयात नव्हते. कार्यकारी अभियंता सिकंदर अली जागेवर नव्हते. आयुक्तांसोबत अफसर सिद्दिकी, रोशन मकवाने, मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात होते.