आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News City And Development Minister Prakash Mehta

अडीच एफएसआय मिळणार, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचाही आग्रह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डीएमआयसीबरोबरच स्मार्ट शहर होऊ घातलेल्या औरंगाबाद शहराचा एफएसआय एकवरून थेट अडीचपर्यंत वाढवण्याचे संकेत गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी शनिवारी सायंकाळी बांधकाम व्यावसायिकांच्या (क्रेडाई) कार्यक्रमात बोलताना दिले. मुंबई, ठाण्यात हा एफएसआय ६ पर्यंत वाढू शकतो. तेव्हा औरंगाबादसारख्या शहरात तो अडीचपर्यंत असायला हवा, अशा थेट शब्दांत त्यांनी शहराला अडीच एफएसआय मिळू शकेल, याचे संकेत दिले आहेत.

सध्या या ऐतिहासिक शहरात केवळ एकच एफएसआय मिळतो. म्हणजे भूखंडाचा जेवढा भाग तेवढेच उंच बांधकाम. परंतु येथील वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण लक्षात घेता येथे किमान दोन एफएसआय हवा, अशी मागणी भाजपचे नवनिर्वाचित आमदार अतुल सावे यांनी निवडून आल्यानंतर लगेच केली होती. त्यानंतर काही दिवसांतच शासनाने यासाठी हरकती-सूचना मागितल्या होत्या. ही प्रक्रिया सुरू आहे. त्याचे पुढे काय झाले, याची माहिती सामान्यांसह क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनाही नाही. नेमके तेव्हाच मेहता यांनी सूचक वक्तव्य केल्याने शहराचा एफएसआय वाढून इमारतींची उंची वाढणार हे स्पष्ट झाले आहे.

प्रकाश मेहता नेमके काय म्हणाले ?
मुंबई-ठाण्यात आम्ही ६ एफएसआय देण्याचा विचार करीत आहोत. उर्वरित महाराष्ट्रासाठीही असाच विचार व्हायला हवा. येथे किमान अडीच एफएसआय देणे शक्य आहे. त्याशिवाय स्वस्तात घरे देणे शक्य नाही. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी डीसी नियमांत बदल करण्याचे प्रयत्न करावेत. स्वस्त घरांसाठी आम्ही बांधकामांच्या नियमात शिथिलता आणण्यास तयार आहोत.

शहराचे सध्याचे चित्र
शहरात फक्त एकच एफएसआय आहे. म्हणजे एखादा भूखंड एक हजार चौरस फुटांचा असेल तर त्यावर जिना व अन्य बाबी वगळता तेवढेच बांधकाम करता येते. म्हणजे एक मजला तेवढा बांधला जातो. पण हाच एफएसआय दुप्पट झाला तर दोन मजले वाढतील. म्हणजेच एकाच भूखंडावर जास्तीचे घरे होतील. अर्थात, हे घर काहीसे स्वस्त असेल अन् स्वस्तात घरे या संकल्पनेला तो पोषक असेल. मेहता यांचे संकेत अतिशय चांगले आहेत. पालिकेचीही तशी तयारी आहे.

घरे २० टक्के स्वस्त होतील
सध्या शहरातील जमिनीचे भाव जास्त अन् बांधकामाची किंमत कमी असे चित्र आहे. तेथे जर एफएसआय वाढले तर किमान २० टक्के दर कमी होऊ शकतील. पण त्यासाठी त्यांनी प्रीमियम आकारायला नको. शहराच्या बाह्य भागात याचा किती फरक पडेल हे सांगता येत नाही. यात टीडीआरची भूमिकाही महत्त्वाची आहे. महाग भूखंडांसाठी हा निर्णय परिणामकारक राहील, असे वाटते.
प्रमोद खैरनार,
राज्य उपाध्यक्ष, क्रेडाई.

पालिका सूत्रे म्हणतात, दोन एफएसआय हवेतच
पालिकेतील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद शहराचा विस्तार लक्षात घेता येथे किमान दोन एफएसआय असावेत. तसेच टीडीआर लोड करण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ नये. तसे झाले तरच विकासक कमी किमतीत फ्लॅट देऊ शकतील.