आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, AAP Election Meeting At Aurangabad

‘आप’च्या निवडणूक बैठकीत कार्यकर्त्यांची धक्काबुक्की

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीचे धोरण ठरवण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. सामान्य कार्यकर्त्यांचे मत विचारात घेतले जात नसल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी पदाधिकार्‍यांनाही चांगलेच धारेवर धरले. या गोंधळाची गंभीर दखल घेत ‘आप’च्या श्रेष्ठींनी बाळासाहेब सराटे, अँड. लक्ष्मण प्रधान, उदयकुमार सोनवणे, मिर एहतेशाम अली यांची पार्टीतून हकालपट्टी केली. तर विनोद झारे, शहजाद खान, अविनाश औटे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.


‘आप’च्या राज्य समितीचे सदस्य शकील अहेमद यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सिद्धिविनायक लॉन्समध्ये बैठक घेण्यात आली. गुरुवारच्या बैठकीत कार्यकर्त्यांना पावणेदोन तास ताटकळत ठेवून मोजक्या सदस्यांसह कोपर्‍यात बैठक आटोपल्यामुळे कार्यकर्त्यांनी थेट पक्षश्रेष्ठींवर आरोप करण्यास सुरुवात केली. सामान्यांचे मत घेऊन उमेदवार निवडण्याऐवजी समितीनेच उमेदवार लादला असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी आलेल्या अहेमद यांना कार्यकर्त्यांनी बोलूच दिले नाही. सोनवणे ओंकारसिंग यांच्यावर धाऊन गेले. तर अँड. प्रधान यांनी अहेमद निष्क्रिय असल्याचा आरोप केला. दरम्यान, बैठकीत तालुकास्तरावर समिती, भ्रष्टाचार मुक्तता, सांप्रदायिक, जातीय सलोखा जपणे, प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण करणे आदी मुद्दय़ांवर चर्चा झाल्याचे पत्रकारांना सांगण्यात आले. दरम्यान, रात्री ‘आप’च्या जिल्हा संयोजिका मनीषा चौधरी यांनी प्रसिद्धिपत्रक काढून चारही सदस्यांची हक्कालपट्टी केल्याचे कळवले. अँड. प्रधान म्हणाले की, ‘आप’च्या काही कार्यकर्त्यांचे सूत इतर पक्षांशी जुळलेले आहे. माझ्यासारखा प्रामाणिक कार्यकर्ता, कायदेतज्ज्ञ श्रेष्ठींना नको आहे. सोनवणे म्हणाले, उमेदवार निवड प्रक्रियेसंदर्भात माझे काही प्रश्न होते. त्याची उत्तरे अपेक्षित असताना बैठक गुंडाळली. जनतेतून उमेदवार देण्याच्या प्रक्रियेलाच छेद देत उमेदवार जनेतवर लादण्यात आले आहेत.


शिस्त लावणार
आजचा प्रकार चुकीचा आहे. गैरवर्तन करणार्‍यांना समज देऊ. समन्वय, संघटनाचा अभाव असल्यामुळे अशा घटना घडतात. दोन दिवसांत उमेदवारांची नावे जाहीर होतील. -शकील अहेमद, राज्य समिती सदस्य ‘आप’


राजकीय करिअर संपवण्याचा डाव
पक्षाविरुद्ध कुठलीही कारवाई केली नाही. औरंगाबाद, जालना येथून लोकसभेचा प्रबळ उमेदवार असल्यामुळे माझा पत्ता कट करण्याचा डाव आखला.पार्टीच्या निवडप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नये म्हणून सूडबुद्धीने ही कारवाई झाली. राजकीय करिअर संपवण्याचा डाव आहे. याविरोधात शुक्रवारी फौजदारी गुन्हा दाखल करू. न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा विचार आहे. बाळासाहेब सराटे, सदस्य, ‘आप’