आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Aurangabad Municipal Corporation, DB Star

होय, आमचाही अनेक वर्षांपासून छळ होतोय!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मनपाची तिजोरी कंगाल झालेली असतानाही विशेष कर आकारणी कक्षात बाबुगिरी कशी ठासून भरली आहे हे डीबी स्टारने उघड केले. 15 मार्च रोजी ‘एकीकडे ठणठणाट, दुसरीकडे छळ’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून या महत्त्वाच्या व गंभीर प्रश्नाला वाचा फोडली. कर आकारणी कक्षामुळे आणि एकूणच मनपाच्या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांची कशी फरपट होते याची असंख्य उदाहरणे समोर आली. कित्येक वर्षांपासून असाच त्रास सहन करणार्‍यांनी स्वत: फोन करून त्यांचाही कसा छळ होतोय हे सांगितले. त्यातील या काही निवडक प्रतिक्रिया..


..तर थेट माझ्याकडे तक्रारी करा
यापुढे करदात्यांची फरपट होणार नाही. याबाबत अधिकार्‍यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. एवढे करूनही त्रास झाल्यास करदात्यांनी यापुढे थेट माझ्याकडे तक्रारी मांडाव्यात.
हर्षदीप कांबळे,आयुक्त, मनपा


नळ बंद, पट्टी सुरूच
मी संपूर्ण पाणी बिल भरून 10 ऑगस्ट 1989 ला नळ कनेक्शन बंद केले होते. पालिकेने दोनदा क्रॉस चेकिंगही केली आहे. पंचनामा करून कनेक्शन बंद केले होते.असे असतानाही मला दरवर्षी पाणीपट्टी येत आहे. ती रद्द करण्यासाठी मी 25 वर्षांपासून चकरा मारतोय, पण अद्याप कुणी दखल घेतली नाही. -प्रेमचंद डोगरदिवे, मयूरनगर, हडको


चौदा वर्षांपासून चकरा मारतोय
जुन्या घरमालकाच्या नावे मनपाने मालमत्ता कराच्या नोटिसा बजावल्या होत्या. तेव्हा मी 17 हजार रुपये भरले होते. मात्र, न्यायालयाने हे बेकायदा ठरवले. त्यामुळे 1994 ला भरलेले हे पैसे मला परत मिळावे किंवा पुढील करात ते वजा करावे यासाठी मी 14 वर्षांपासून चकरा मारत आहे. अद्याप माझे काम झाले नाही.
महेंद्र रुणवाल,पेन्शनपुरा


तेरा वर्षांपासून छळ
मनपाने चुकीच्या नोटिसा पाठवल्या व आमची दुकाने सील केली. आम्ही न्यायालयात गेलो. न्यायालयाने या नोटिसा रद्द केल्या. 1994 पासून हे 5 हजार रुपये परत मिळवण्यासाठी आमचे 10 हजार खर्च झाले. ही चूक दुरुस्त करून पुढील कर घ्या म्हणत आहोत, पण कुणीही दखल घेत नाही. -भुम्मय्या रायल्ला,नूतन कॉलनी