औरंगाबाद - विमानतळावर प्रवाशांच्या बॅगा लोड करायचो, तेव्हा मनातही नव्हते की मी नगरसेवक होईन, नंतर चोकअप काढणे, ड्रेनेजच्या कामांचा ठेका घेताना ज्या महानगरपालिकेत अधिकार्यांच्या केबिनबाहेर थांबून वाट पाहायचो त्याच महापालिकेत कधी स्थायी समितीचा सभापती होईल, असे वाटले नव्हते, असे सांगत स्थायी समितीचे नवनियुक्त सभापती विजय वाघचौरे यांनी आपली सामान्य तरुण ते सभापती प्रवासाची कहाणी सांगितली.
काल झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या वाघचौरे यांनी काशीनाथ कोकाटे यांचा पराभव केला आणि सभापतिपदावर ते विराजमान झाले. गेल्या 28-29 वर्षांत शिवसेनेने औरंगाबादेत अनेक स्थित्यंतरे अनुभवली. प्रारंभीच्या काळात समाजातील सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याला राजकारणात आणून स्थिरस्थावर केले. त्या वेळी शिवसेनेने ती आपली ओळख केली होती. नंतरच्या काळात हीच मंडळी प्रस्थापित झाली आणि पुन्हा सामान्य कार्यकर्त्यांना सत्तेची दारे बंद झाल्यासारखी अवस्था झाली. त्याच त्या चेहर्यांभोवती मनपाची सत्ता फिरत राहिली. यंदा विजय वाघचौरे यांना संधी देत शिवसेनेने पुन्हा जुन्या शिवसेनेची आठवण करून दिली. वाघचौरे यांची कहाणी त्यामुळेच महत्त्वाची ठरते. ‘दिव्य मराठी’शी बोलताना त्यांनी आपला प्रवास उलगडून सांगितला.
विमानतळावर बॅगा उचलल्या
ते म्हणाले की, 1992 च्या सुमाराला आयटीआयमधून इलेक्ट्रिशियनचा कोर्स करून बाहेर पडलेल्या वाघचौरे यांनी आधी वडिलांच्या बांधकाम व्यवसायात सहभाग घेतला. सेंटरिंग करणे, बांधकामाचे सगळे काम करणे याचा अनुभव घेतल्यानंतर वाळूजला तीन वर्षे एका मोटार रिवायंडिंगच्या दुकानात नोकरी केली. महिन्याकाठी पगाराशिवाय रोज यायला-जायला 5 रुपये मिळायचे. शिवाय इलेक्ट्रिकलची छोटी-मोठी कामे करायचो. मग 1995 च्या सुमाराला चिकलठाणा विमानतळावर लोडर म्हणून काम करायला सुरुवात केली. प्रवाशांच्या बॅगा विमानात नेणे, व्यवस्थित ठेवणे, आलेल्या विमानातील बॅगा काढणे, असे ते काम होते. दिवसाला 127 रुपये मिळायचे. तीन वर्षे ते काम केले. महिन्याकाठी दीड ते दोन हजार रुपये मिळायचे. हे करत असतानाच शिवसेनेकडे आकर्षित झालो; पण पदाचा कधी विचार केला नाही. पक्षाचे काम करत गेलो. हे करताना छोटी-मोठी कामे मिळत गेली.
ही संधी माझ्यासाठी मोठी
आमदार संजय शिरसाट नगरसेवक होते, तेव्हा मग छोटी-मोठी कामे घ्यायला लागलो. रेटलिस्टची कामे असायची अडीच, तीन हजारांची. कुठे ड्रेनेजचे चोकअप काढ, कुठे ढापेच बदल अशी कामे करताना इलेक्ट्रिशियनची कामेही करत होतो. हे सगळे करताना आपल्याला नगरसेवक व्हावे, राजकारणात पद मिळावे असे कधी वाटले नाही; पण संधी मिळाली. आतासुद्धा स्थायी समिती सभापती हे पद मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. मोठय़ा लोकांसमोर आपला काय निभाव लागणार, असे वाटत होते; पण तेही शक्य झाले.