आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Aurangabad Municipal Corporation, Water

विस्कळीत पाणीपुरवठा आज होणार सुरळीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - वादळी वारे, गारपीट आणि पावसानंतर जायकवाडीतील मनपाच्या पंपिंग स्टेशनला विजेचा प्रश्न भेडसावू लागला असून त्याचा परिणाम म्हणून गेल्या दोन दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. आज काही भागांत अतिशय कमी दाबाने पाणी आले असले तरी उद्या धूलिवंदनाला मात्र पाण्याची अडचण होणार नाही, असे मनपाच्या वतीने सांगण्यात आले आहे.


जायकवाडीतून औरंगाबाद शहरासाठी पाणी उपसून पोहोचवण्याचे काम करणारी मनपाची यंत्रणा सध्या विजेच्या लपंडावामुळे अडचणीत आली आहे. घोषित, अघोषित लोडशेडिंग आणि वीजपुरवठा नियमित नसणे यामुळे पंपिंग स्टेशन शटडाऊन होण्याचे प्रकार वाढले आहेत.


गेल्या दोन दिवसांत या प्रकारामुळे औरंगाबाद शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या. परिणामी शहरातील पाण्याच्या टाक्या निर्धारित वेळेत भरल्याच नाहीत. त्यामुळे ज्या भागांत पाणीपुरवठा होता, तेथे कमी दाबाने पाणी आले. काही भागांत पाण्याची चांगलीच ओरड झाली. रविवारी जुन्या शहरात पाण्याचा तुटवडा पाहायला मिळाला.


या संदर्भात पाणीपुरवठय़ाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी सांगितले की, एमएसईबीकडून होणार्‍या वीजपुरवठय़ात येत असलेल्या अडचणीमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. मात्र शहराला पाणी कमी येत नसून पुरवठा फक्त विस्कळीत झाला आहे. धुळवडीच्या दिवशी पाण्याची अडचण जाणवणार नाही, याची मनपाने खबरदारी घेतली आहे.