आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Aurangabad Police Commissioner Rajendra Singh

सराईत गुन्हेगारांच्या कुंडल्या काढा, पोलिस आयुक्तांचा अधिका-यांना आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीत कुठलीही अनुचित घटना घडणार नाही, याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. त्यासाठी गुन्हेगारांवर नजर ठेवा, हिंस्र कार्यकर्त्यांना आवरा, त्याशिवाय सराईत गुन्हेगारांच्या कुंडल्या काढा, वेळप्रसंगी त्यांना गजाआड ठेवा, असे आदेश नवनियुक्त पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी अधिकार्‍यांना दिले. आयुक्तालयात सोमवारी सिंह यांनी पहिल्या ‘क्राइम कॉन्फरन्स’दरम्यान हे आदेश दिले.


सिंह यांनी 21 फेब्रुवारीला सूत्रे स्वीकारल्यापासून धडाक्यात कामाला सुरुवात केली आहे. महत्त्वाचे सर्व अधिकारी रुजू झाले असून सोमवारी आयुक्तालयात सकाळी अकरा ते दुपारी अडीचपर्यंत त्यांनी ‘क्राइम कान्फरन्स’ घेतली. कठोर निर्णय घेण्याच्या सूचना त्यांनी या वेळी अधिकार्‍यांना दिल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागता कामा नये. त्यासाठी हवी ती पावले उचलण्याचे त्यांनी अधिकार्‍यांना बजावले. बैठकीला मुख्यालयाचे पोलिस उपायुक्त, परिमंडळाचे दोन पोलिस उपायुक्त, सर्व सहायक पोलिस आयुक्त आणि ठाण्यांच्या सर्व पोलिस निरीक्षकांची उपस्थिती होती. त्याशिवाय गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारीही हजर होते. तटस्थ आणि पारदर्शकपणे काम करा, पोलिसांनी नागरिकांची सेवा करावी, गुप्त बातमीदारांची संख्या वाढवा, अधिकार्‍यांनी संवेदनशील ठिकाणी गुप्त भेटी द्याव्यात, दाखल गुन्ह्यांचा निपटारा त्वरित करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.


हिंस्र राजकीय कार्यकर्त्यांना आवरा
गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात कुठलीही कसर सोडू नये, निवडणुका निकोप आणि शांततेत पार पाडण्याची सर्वात मोठी जबाबदारी पोलिसांवर असल्याचे सिंह यांनी बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळे हिंस्र राजकीय कार्यकर्त्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले. ज्यांच्यावर जुने गुन्हे दाखल आहेत किंवा हिस्ट्री शीटरचे (सराईत गुन्हेगारांना) रेकॉर्ड (कुंडल्या) काढण्याचे त्यांनी क्राइम कॉन्फरन्समध्ये सांगितले.