आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Aurangabad Zilha Parishad, Education Officer

शाळा मान्यतेबाबत चौकशी करून 3 दिवसांत अहवाल द्या, शिक्षणाधिका-यांचा आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुखना नदीपात्रात अवैध बांधकाम करून नगरसेवकाने उभारलेल्या स्वयंभू शिक्षण संस्थेला प्राथमिक शाळेची मान्यता तपासा, असे स्पष्ट आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिका-यांनी दिले आहेत. येत्या तीन दिवसांत त्याचा अहवाल सादर करा आणि शाळा बेकायदेशीर असल्याचे उघड झाल्यास त्वरित त्याची मान्यता काढून घ्या, असेही त्यांनी गटशिक्षणाधिका-यांना बजावले आहे. याबाबत डीबी स्टारने वृत्त प्रसिद्ध करून वारंवार पाठपुरावाही केला. त्यानंतर शिक्षणाधिका-यांनी तातडीने पावले उचलली.


चिकलठाणा येथील चौधरी कॉलनीसमोर सुखना नदीपात्रात व काठावर अनेकांनी अतिक्रमण करून बांधकामे केली आहेत. त्यातच स्वयंभू शिक्षण व सांस्कृतिक मंडळाच्या नावाने प्राथमिक शाळाही उभारण्यात आली आहे. या सर्व अतिक्रमणामुळे 260 फुटांचे नदीपात्र फक्त 20 फूट झाले असून या नदीचा अक्षरश: नाला झाला आहे. नागरिकांनी ही शाळा इतरत्र हलवण्याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे दोन वर्षांपासून तगादा लावला होता, मात्र शिक्षण विभागाने कानाडोळा केला अखेर नागरिकांनी डीबी स्टारकडे कैफियत मांडली. 1 फे बु्रवारी रोजी ‘260 फुटांचे पात्र झाले 20 फूट’ या मथळयाखाली वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत या विनापरवाना शाळेची चौकशी करण्याबाबत 17 फेबु्रवारी रोजी शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी खास बैठक घेतली. सुरेश पवार यांनी प्रत्यक्ष भेटून दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आणि डीबी स्टारमधील वृत्तावरून या शाळेची तपासणी करण्याचे आदेश उपासनी यांनी दिले. तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी गटशिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांना दिले आहेत.


या प्रकरणी पारदर्शक चौकशी केली जाईल
कालच आदेशाचे पत्र मिळाले. विस्तार अधिका-यांना स्वयंभू शिक्षण व सांस्कृतिक मंडळ या शाळेची चौकशी करण्यासाठी आदेश वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून अहवाल सादर करणार.
-प्रियाराणी पाटील,
गटशिक्षणाधिकारी, जि.प.


धोका दूर होईल
डीबी स्टारच्या वृत्तानंतर महानगरपालिकेच्या पाठोपाठ जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागही जागा झाला. आता आम्ही विद्यार्थी आणि चिकलठाणावासीयांना पुरापासून होणारा धोका दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे.
-सुरेश पवार, तक्रारदार