आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेच छोटे चौक, खराब रस्ते; सहाशे रिक्षा मात्र वाढणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरात रिक्षाचालकांच्या बेशिस्त वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त आहे. रिक्षांसाठी स्वतंत्र थांबे नाही. शहरात सुमारे 10 हजार स्क्रॅप रिक्षा धावत आहेत. त्या रिक्षांवर कोणतीच कारवाई न करता राज्यशासन सहाशे नवे रिक्षांचे परवाने वाटणार आहे. शहरातील तेच छोटे चौक, तेच अरुंद आणि खराब रस्ते त्यात आता सहाशे रिक्षांची भर; त्यामुळे आधी रस्ते दुरुस्त करा आणि नंतर रिक्षांना परवाने द्या अशी मागणी प्रवासी करत आहेत.


राज्यभरात सुमारे 81 हजार रिक्षांचे नवीन परवाने वाटण्यात येणार आहे. बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतील अंधेरी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात लॉटरी पद्धतीने त्याचे वाटप होणार आहे. शहरातील एक हजार इच्छुकांपैकी सहाशे जणांना परमिट मिळेल.


आधीच अडीचशे सहा आसनी (मिनीडोअर) रिक्षाचे परमिट बदलून त्यांना रिक्षाचे परमिट देण्यात आले होते. त्यात आणखी रिक्षांची भर वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण करणारी ठरेल असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे परवाने नसलेल्या सुमारे दहा हजार रिक्षावर आधी कारवाई करा आणि नंतर नवीन परवान्याचे वाटप करा अशी मागणी रिक्षाचालक संघटना करत आहेत.


सद्य:परिस्थिती
0सध्या शहरात सुमारे 25 हजार रिक्षा
0 यातील 10 हजार रिक्षांकडे परवाना नाही
0 स्क्रॅप रिक्षांकडे परिवहन विभागाकडून दुर्लक्ष
0 मुख्य रस्त्यांवर रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र थांबे नाही
0 प्रीपेड रिक्षा मोहिमेला जास्त यश नाही.


स्वतंत्र थांबे द्या
रिक्षाचालकांना स्वतंत्र थांबे द्या, त्यामुळे वाहतुकीची कोंडी थांबेल. नवीन परवाने घेणार्‍या रिक्षा चालकांना वाहतूक नियमाचे प्रशिक्षण द्या. समाधान शेळके, प्रवासी


रस्त्यांची दुरुस्ती करा
शहरातील रस्त्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. रिक्षांसाठी स्वतंत्र रस्ता आणि थांबे देणे आवश्यक आहे. गजानन काळे, प्रवासी


आधी कारवाई करा
सध्या शहरात 17 हजार परवानेधारक रिक्षा आहेत. विनापरवाना धावणार्‍या रिक्षांवर कोणतीच कारवाई होत नाही. आधी त्यांच्यावर कारवाई करा, नंतर नवीन परवाने वाटा. निसार अहमद, सचिव, रिक्षाचालक, मालक संघर्ष कृती समिती