आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या अंगावरील दागिने मोडून मिळवला जामीन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिमुकल्या मुलीसमवेत श्रीकांत ढगे. - Divya Marathi
चिमुकल्या मुलीसमवेत श्रीकांत ढगे.

औरंगाबाद - ज्या पक्षातील नेत्यांसाठी दिवसरात्र कष्ट केले, सणवार पाहिले नाहीत, आदेश दिला की हातात दगड घेऊन उभा राहिलो, अशा मनसेच्या शहर पदाधिकार्‍यांनी मला माझ्या वाढदिवशी तुरुंगात खितपत पडू दिले. त्यांच्यापेक्षा पोलिस बरे. त्यांनी वाढदिवशी पेढय़ाचा घास तरी भरवला. शेवटी बायकोच्या गळ्यातील हार आणि आईची पोत गहाण ठेवून माझा जामीन घ्यावा लागला, अशा शब्दांत मनसे कार्यकर्ता श्रीकांत ढगे याने मनसेच्या पदाधिकार्‍यांविषयी नाराजी व्यक्त केली.


ढगे म्हणाले, राज ठाकरे यांना अटक केल्याच्या निषेधार्थ तोडफोड करणार्‍या कार्यकर्त्यांना पोलिसांनी 12 फेब्रुवारीला ताब्यात घेतले होते.


या कार्यकर्त्यांना भेटायला गेलो म्हणून पोलिसांनी मलाही ताब्यात घेतले. आठ दिवस तुरुंगात खितपत पडलो होतो. जामीन घेण्यासाठी सातबारा द्यावा लागत होता. मात्र कोणताही मनसेचा पदाधिकारी समोर आला नाही. अखेर माझ्या भावाने पत्नीच्या गळ्यातील हार आणि आईची पोत गहाण ठेवून जामिनासाठी 25 हजार रुपये भरल्यामुळे माझी सुटका झाली.


गारखेडा परिसरातील विजयनगर भागात राहणारा श्रीकांत ढगे हा 2009 मध्ये मनसेचा उपविभागाध्यक्ष होता. आता त्याच्याकडे कुठलेही पद नाही. सामान्य घरात राहणार्‍या 23 वर्षांच्या या तरुणाला सामाजिक कार्याचा ध्यास आहे. यासाठी त्याने मनसेचा झेंडा हाती घेतला. श्रीकांतचे वडील वेल्डिंगचे काम करतात. तो स्वत: प्लॉटिंग एजंट म्हणून काम करतो. त्याचा लहान भाऊ त्याला या कामात मदत करतो. या 15 फेब्रुवारीला त्याचा वाढदिवस होता. त्याने वॉर्डात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजनही केले होते.
मात्र आंदोलनाच्या वेळी तुरुंगात गेल्यामुळे या सगळ्या कार्यक्रमांवर पाणी फिरले. त्याला आठवत होत्या ‘झेंडा’ सिनेमातील गाण्याच्या ‘उजळावा दिवा म्हणुनिया किती मुक्या बिचार्‍या जळती वाती, वैरी कोणी आहे इथे कोण साथी , विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती’ या ओळी.


अनेक कार्यकर्त्यांचे सहा वर्षांपासून कोर्टाचे खेटे सुरूच
राजकीय आंदोलनामुळे अनेकदा गुन्हे दाखल होतात. राजकारणात करिअर करायचे, असे ठरवणार्‍या तरुणांसाठी ही बाब जरी मोठेपणाची असली तरी केवळ सामाजिक कार्य म्हणून आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांना हे गुन्हे आयुष्यभर सोसावे लागतात. 2008 मध्ये मनसेच्या राजकीय आंदोलनात सहभागी झाल्यामुळे गुन्हे दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना आजही नियमितपणे कोर्टात खेटे मारावे लागतात.