आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Balasaheb Thorat, Revenue Minister, Divya Marathi

आचारसंहितेतही महसूलमंत्र्यांचे ‘उद्योग’?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - बिडकीन तसेच नजीकच्या पाच गावांतून संपादित करण्यात आलेल्या 2300 हेक्टर जमिनीचा 1312 कोटी रुपयांचा मोबदला मार्चअखेर वाटप व्हायला हवा होता. जिल्हा प्रशासनाने त्याची सर्व तयारी पूर्ण केली होती. अवॉर्डही तयार आहेत. मात्र, हे वाटप आपल्याच हस्ते व्हावे यासाठी राज्याच्या महसूलमंत्र्यांनी फाटा घातल्याने ही रक्कम वाटप होणे शक्य झाले नसल्याचे मुंबईस्थित उच्चपदस्थांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, 75 कोटी रुपये बुधवारी प्राप्त झाले असून गुरुवारी आणखी 100 कोटी रुपये येतील आणि लगेच वाटप होईल, असा दावा जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी केला आहे.


दुसरीकडे मार्चअखेरीस सर्व रक्कम हाती पडणार, असे गृहीत धरून येथील शेतकर्‍यांनी परस्पर व्यवहार केले आहेत. मात्र, करार पूर्ण करता येत नसल्यामुळे ही मंडळी हवालदिल झाली आहे. दिलेला शब्द पाळता येत नसल्याची खंत शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे निवडणुकीच्या कामामुळे मोबदला देण्यास विलंब होत असल्याचे कारण आतापर्यंत प्रशासनाकडून देण्यात येत होते. मात्र, एमआयडीसीची यंत्रणा सज्ज असल्यामुळे हे कारणही खोटे असल्याचे स्पष्ट होत आहे.


मार्च महिन्याच्या अखेरीस कोणत्याही परिस्थितीत निम्मी रक्कम तरी या पाच गावांतील शेतकर्‍यांच्या हाती पडलेली असेल, असे जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले होते. जमिनीची मोजणी पूर्ण आहे, त्याचबरोबर अवॉर्डही तयार असल्यामुळे फक्त शासनादेशाची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी म्हटले होते.


मोबदला देण्यासाठी शासनाकडून राजपत्रात प्रसिद्ध करावयाच्या बाबी प्रसिद्ध होऊन पंधरा दिवस लोटले. राजपत्रात प्रसिद्धी झाल्यानंतर त्याच आठवड्यात मोबदला वाटप होईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र, अजून कोणतीही सूत्रे हलली नाहीत. जिल्हाधिकारी विक्रम कुमार म्हणाले, 75 कोटी रुपये बुधवारी आले आणि गुरुवारी आणखी 100 कोटी रुपये येतील आणि 175 कोटी रुपयांचे वाटप लगेच सुरू होईल, असा दावाही त्यांनी केला.