आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Beed Bypass, Tenth Board Examination Answer Set

बीड बायपास रस्त्यावर सापडला दहावीच्या उत्तरपत्रिकांचा गठ्ठा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - निरक्षर रिक्षाचालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे दहावीच्या सात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले आहे. रहेमानिया कॉलनी येथील रहिवासी शेख रफिक कुरेशी यांना सापडलेल्या हिंदी विषयाच्या उत्तरपत्रिकांचा गठ्ठा त्यांनी ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात जमा केल्यानंतर तो एसएससी बोर्डाच्या अधिकार्‍यांकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रकरणी संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बोर्डाचे अध्यक्ष सुखदेव डेरे यांनी दिला आहे.
रिक्षाचालक कुरेशी सेव्हन हिल्स उड्डाणपूल ते शिवाजीनगरदरम्यान रिक्षा चालवतात. शनिवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास त्यांना उड्डाणपूल ते बीड बायपासपर्यंतचे भाडे मिळाल्याने त्यांनी प्रवाशांना दत्त मंदिराजवळ सोडले. परत येताना दत्त मंदिराजवळील वळणावर त्यांना लाल रंगाची बॅग पडलेली दिसली. ही बॅग कोणाची असेल म्हणून त्यांनी परिसरात चौकशी केली. मात्र, कोणीही बॅग घेण्यास तयार नव्हते. बॅगमध्ये काही कागदपत्रे, जेवणाचा डबा, पेन असे साहित्य असल्याचे त्यांना दिसले. बॅगचा मालक परत येईल, या आशेने कुरेशी त्याच वळणावर अर्धा तास उभे राहिले. मात्र, कोणीही बॅग घेण्यासाठी आले नाही. हातावर पोट असलेल्या कुरेशी यांनी पुन्हा सेव्हन हिल्स गाठत आपला व्यवसाय सुरू केला. सकाळी 11 वाजता कुरेशी जेवण करण्यासाठी घरी गेले.
जेवणानंतर त्यांचा डोळा लागला. दरम्यान, कुरेशींच्या कुटुंबीयांनी ही बॅग उघडून पाहिली. त्या वेळी शेजारी राहत असलेला 10 वीचा विद्यार्थी निहाल देशमुख खालेद देशमुखदेखील तेथे होता. या 10 वीच्या उत्तरपत्रिका असल्याचे निहालने ओळखले. त्याने या महत्त्वाच्या असल्याचे कुरेशी यांच्या लक्षात आणून दिल्याने कुरेशी पुन्हा दुपारी 2 वाजता बॅग सापडलेल्या ठिकाणी गेले. तेथील काही घरांत, दुकानांत त्यांनी बॅग कोणाची आहे का, अशी चौकशी केली; पण कोणीच प्रतिसाद देत नसल्याने कुरेशी चौरंगी हॉटेलजवळील रिक्षा स्टँडवर परतले.
गहाळ उत्तरपत्रिकांची तोंडी तक्रार
शिवाजीनगर परिसरातील ज्ञानांकुर विद्यालयाच्या शिक्षिका वैशाली सुतवणे यांनी हा उत्तरपत्रिकांचा गठ्ठा गहाळ झाल्याचे एसएससी बोर्डाला तोंडी कळवले होते, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च् माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव प्रदीप चौसाळकर यांना दिली. ‘दिव्य मराठी’ने हा गठ्ठा चौसाळकर यांना सुपूर्द केला.
आजोबांनी दिला ‘दिव्य मराठी’त जाण्याचा सल्ला
रिक्षा स्टँडवर दोन विद्यार्थिनींना कुरेशी यांनी बॅग दाखवल्यावर त्यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात जमा करण्याचा सल्ला दिला. त्याच वेळी बाजूला उभ्या असलेल्या एका आजोबांनी पोलिसांत जाऊ नका, ते तपासाला खूप उशीर लावतात. त्यापेक्षा दैनिक ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात बॅग जमा करा, असा सल्ला दिला.
विद्यार्थ्यांसाठी आलो
मी निरक्षर आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे भविष्य माझ्यामुळे वाचू शकते, असे मला कुटुंबीयांनी सांगितले. याच भावनेने मी माझा व्यवसाय बुडवून ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात या उत्तरपत्रिका घेऊन आलो. शेख रफिक कुरेशी, रिक्षाचालक
कारवाईची सूचना
हा प्रकार गंभीर आहे. हे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. या संदर्भात संबंधितांवर कारवाई करण्याची सूचना शिक्षणाधिकार्‍यांना देणार आहोत. सुखदेव डेरे, अध्यक्ष, एसएससी बोर्ड
प्रकरणाची माहिती नाही
असा काही प्रकार घडला आहे, याची माहिती नाही. याबाबत माहिती मिळाल्यावरच सांगता येईल. गोविंद पाटील, संस्थाचालक, ज्ञानांकुर विद्यालय
निरक्षराला कळले शिक्षणाचे महत्त्व
निरक्षर असल्याने गांभीर्य नव्हते रिक्षाचालक कुरेशी हे निरक्षर आहेत. त्यामुळे बॅगमधील उत्तपत्रीकेचे त्यांना गांभीर्य नव्हते. शेजारील निहालने हा 10वीच्या उत्तरपत्रिकांचा गठ्ठा असून तो महत्त्वाचा असल्याचे सांगितले.