आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Bhausaheb Thorat, Divya Marathi, Donation

हाती संपत्ती नसतानाही विद्यार्थी, गरजवंतांना तो करतोय आपल्या मिळकतीतून मदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हलाखीत गेलेले बालपण, पदोपदी सहन करावा लागलेला त्रास आणि त्यामुळे अर्धवट सोडावे लागलेले शिक्षण... अशी वेळ इतर कुणावर येऊ नये यासाठी एका तरुणाने अडलेल्यांना मदत करून समाजसेवेचे व्रत हाती घेतले आहे. शिक्षणासाठी गरीब मुलांना मदत करणे, लग्नकार्यात मदतीचा हात देणे, हलाखीची परिस्थिती असणा-यांचे दु:ख वाटून घेणे... आदी कामे तो करतो. गेली 17 वर्षे त्याचे हे कार्य अखंडितपणे सुरू आहे.


लासूर स्टेशन येथील या 35 वर्षीय तरुणाचे नाव आहे भाऊसाहेब देविदास थोरात. गावात 10 एकर शेती, परंतु सावत्र आईशी होणा-या वादामुळे संपत्तीत वाटा न घेताच तो घरातून वेगळा झाला. या परिस्थितीमुळे नववीतच शाळा सोडून रोजमजुरीची वेळ ओढावली. उदरनिर्वाहासाठी गवंड्याचे काम करू लागला. सन 2000 मध्ये लग्न झाले, तेव्हा बायकोला साडी घेण्यासाठी पैसे नव्हते. हे दु:ख इतरांच्या वाट्याला येऊ नये, या भावनेतून 17-18 वर्षांचा असल्यापासूनच भाऊसाहेब समाजकार्य करू लागला. हळूहळू गवंडी काम करतानाच सेंटरिंगचे कंत्राट मिळू लागले. आता हाताखाली 35 ते 40 लोक काम करतात. आजही चरितार्थ भागवल्यावर उर्वरित पैसे कसलाही हिशेब न ठेवता समाजकार्यात लावतो.


सुख-दु:खात सहभागी : स्वत:च्या लग्नात पत्नीला साडी घेण्यासाठी त्याला दोन आठवडे काम करावे लागले होते. त्यामुळे इतरांना लग्नकार्यात मदतीसाठी नेहमीच तत्पर असतो. आतापर्यंत अनेक लग्नांमध्ये किराणा, अन्नदान तसेच मंडपाचा खर्च त्याने उचलला आहे. भविष्यात गरिबांसाठी सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा मानस आहे. शुभकार्यातच नाही, तर दु:खातही तो मदतीला धावून जातो. या दुनियेचा निरोप घेणार्‍यांचा अंत्यविधी, दशक्रिया विधीसाठी मदत करतो.


मान्यवरांकडून कौतुक : भाऊसाहेबच्या कार्याची माहिती मिळाल्याने त्याला भेटण्यासाठी ज्येष्ठ नाटककार प्रा. दिलीप महालिंगे, उपप्राचार्य खंदारे, प्रा. टी.आर. पाटील, प्रा. राम गायकवाड ही मंडळी भाऊसाहेबला भेटण्यासाठी लासूर स्टेशनला गेली. हा दिवस माझ्यासाठी आयुष्यातील अविस्मरणीय दिवस असल्याचे भाऊसाहेब म्हणतो.


वाईट अनुभवांना तिलांजली : समाजकार्याचे व्रत घेतलेल्या भाऊसाहेबला अनेक चांगले-वाईट अनुभव आले. ऐनवेळी धावून आल्यामुळे लोक कृतज्ञता व्यक्त करतात. मात्र, काही लोकांनी खोटे कारण दाखवून मदत मिळवली. एका बहाद्दराने तर वडिलांचा दहावा असल्याचे सांगून पैसे घेतले आणि रात्री दारू प्याला; परंतु अशा कटू अनुभवांना तिलांजली देऊन पुढील कार्याला लागतो, असे भाऊसाहेब म्हणतो.


अर्धांगिनीची पूर्ण साथ : लग्न झाल्यावर प्रपंच साभाळून भाऊसाहेबने आपली समाजसेवा सुरूच ठेवली. मात्र, पत्नी रमाईने कधीही त्याच्या कार्यात खोडा घातला नाही. उलट प्रत्येक वेळी आपल्याला पत्नीची साथ व प्रोत्साहान मिळाल्याचे भाऊसाहेब सांगतो. भाऊसाहेबला तीन मुले असून मोठय़ा मुलीचे नाव हुदली, लहानीचे मयूरी, तर मुलाचे झागुला असे आहे.


विद्यार्थ्यांना मदत
आपल्याप्रमाणे गोरगरीब विद्यार्थ्यांना मध्येच शिक्षण थांबवण्याची वेळ येऊ नये, म्हणून आतार्यंत त्याने शेकडो विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क, वह्या-पुस्तके, गणवेश घेऊन दिले. नवीन शैक्षणिक वर्षांपासून लासूर स्टेशन परिसरात असलेल्या प्रत्येक शाळेतील आईवडील नसलेल्या 10 विद्यार्थी व 10 विद्यार्थीनींना गणवेश, वह्यापुस्तके व बूट घेऊन देण्याचा भाऊसाहेबचा संकल्प आहे.


>समाजात दाखवण्यासाठी, वाचवण्यासाठी आणि लोकात चर्चा होण्यासाठी असे तीन प्रकारचे मदत करणारे पाहतो. मात्र, भाऊसाहेब या तीनही प्रकारात बसत नाही. दुसर्‍याला देण्याची क्षमता नसतांनादेखील तो कष्टातून मिळावलेल्या पैशातून गरजवंतांना मदत करतो. शालेय विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके घेऊन देतो. भाऊसाहेबाचे कार्य पाहून आम्ही थक्क झालो.
प्रा. दिलीप महालिंगे,ज्येष्ठ नाटककार


भाऊसाहेब यांच्या कुटुंबाला भेट दिल्यानंतर संत कबीर, संत तुकारामांची आठवण येते. त्यांच्या कार्यात सहभागी असलेली रमाई खरंच आई म्हणून वावरते. यांचे कार्य आम्हा सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. प्राध्यापक या नात्याने भाऊसाहेबसारखे विद्यार्थी घडविण्याचा आमचा प्रयत्न राहिल.
प्रा. राम गायकवाड,विवेकांनद महाविद्यालय