आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Board Examination, Eye Operation

अन् अंधाराची भीती गेली!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कागद, प्लास्टिक, काच हे अन्य कुठलेही पदार्थ चिकटवण्याची ताकद असलेले स्टिकफास्ट डोळ्यात घुसले तर.. होय, असा प्रकार घडला आणि तोही एका दहावीमध्ये शिकणार्‍या मुलीसोबत. दुसर्‍या दिवशी दहावीचा भूगोलाचा पेपर.. त्यात घरी अभ्यास करताना चुकून ही भयंकर गोष्ट घडली..काही सेकंदातच बुबुळावर स्टिकफास्टचा थर पसरला. जीवघेण्या वेदनांनी ती किंचाळतेय. पापण्यांबरोबर डोळा अक्षरश: चिकटला. काळाकुट्ट अंधार पसरला..परीक्षा तर दूरच, दृष्टीच जाते की काय ही भीती.. सुदैवाने 20 व्या मिनिटाला ती रुग्णालयात पोहोचली. तेथे डॉक्टरांच्या रूपाने जणू देवच भेटला. त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले आणि डोळा वाचला. दुसर्‍या दिवशी पेपरही चांगला गेला. शेवट गोड झाला..अशा घटना तुमच्या-आमच्याही घरात घडू शकतात. अशा वेळी जीवनच उद्ध्वस्त होऊ शकते. तरीही असा प्रकार झालाच तर काय करावे हे सांगणारा डीबी स्टारचा हा खास रिपोर्ट..


सिडको एन-4 चा भाग. 20 मार्च, गुरुवारचा दिवस. संध्याकाळी 6 ची वेळ. मिताली खटावकर नावाची दहावीतील विद्यार्थिनी स्टडी टेबलवर पुस्तकांचा पसारा मांडून दुसर्‍या दिवशीच्या भूूगोलाच्या पेपरचा अभ्यास करत होती. पॅ्रक्टिकलचा भाग म्हणून तिला मॉडेल तयार करायचे होते. यासाठी तिने ‘चुटकी में चिपकाये जानेवाला’ स्टिकफास्ट घेऊन आपले साहित्य चुटकीत चिकटवले. मात्र दुसर्‍याच क्षणी ट्यूबचे झाकण लावताना ट्यूबमधील स्टिकफास्ट मितालीच्या उजव्या डोळ्यात ताडकन उडाले. क्षणात डोळ्यासमोर पांढराशुभ्र पडदा उभा राहिला.


तीव्र वेदनांमुळे तडफड
डोळ्यात जणू टाचण्या टोचाव्यात अशा वेदना सुरू झाल्या. मितालीने दुसर्‍याच क्षणी आईला जिवाच्या आकांताने आवाज दिला. आई पळत आली. घडला प्रकार तिच्या लक्षात आला. आईने मितालीच्या बाबांना बोलावले. एव्हाना स्टिकफास्टने आपले काम केले होते. बुबुळावर पसरलेल्या थरावर पापण्या चिकटल्या आणि डोळा पूर्ण बंद झाला. तोपर्यंत बाबा आले. त्यांनी लगेच ऑप्टेक रुग्णालयाचे नेत्रशल्यचिकित्सक डॉ. संतोश काळे यांना फोन लावून सगळी कल्पना दिली.


डॉक्टरांनी केली जय्यत तयारी
इकडे डॉ. संतोष काळे यांनी डोळ्यावर पाण्याचा मारा करा आणि लगेच मुलीला घेऊन येण्याचा सल्ला दिला. आई-बाबांनी मितालीला घटनेच्या 20 व्या मिनिटीत रुग्णालयात दाखल केले. डॉ. काळे यांनी पेशंट येणार यांची कल्पना असल्याने सगळी जय्यत तयारी करून ठेवली होती. मितलीला लगेच थेट ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले.


झाला तत्काळ उपचार
डॉ. काळे यांनी मितालीचा डोळा धुतला. यंत्राच्या मदतीने स्टिकफास्ट कुठे कुठे आहे हे तपासले. बुबुळ आणि पापणीच्या खालच्या बाजूने हा पदार्थ घट्ट चिकटून बसल्याचे लक्षात आले. मग त्यांनी ग्लास रॉडने हा पदार्थ काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हे करताना त्यांनाही धाकधूक होती, ती म्हणजे डोळ्याला कितपत इजा झाली याची. तरीही हिंमत करून त्यांनी पूर्ण कौशल्याने डोळा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. बुबुळ आणि पापणीच्या खाली पसरलेला थर ‘फोर सेफ’च्या साहाय्याने काढला आणि हे ‘मिशन ऑपरेशन’ यशस्वी झाले. अर्थात जखमा मात्र होत्याच. त्यावर तत्काळ उपचार करून डोळा वाचवला. यानंतर मिताली आणि तिच्या आई-बाबांचा जीव भांड्यात पडला. कारण डोळा तर वाचला होताच. शिवाय दुसर्‍या दिवशी परीक्षाही देता येणार होती. दुसर्‍याच दिवशी मितालीने भूगोलाचा पेपर दिला. विशेष म्हणजे या सगळ्या ताणतणावात तिला हा पेपरही चांगला गेला. त्यामुळे देवासारखे मदतीला धावलेले डॉ. संतोष काळे यांना तिने आणि तिच्या कुटुंबीयांनी लाख-लाख धन्यवाद दिले.


..तर ही काळजी घ्या
अशी एखादी घटना घडली तर योग्य काळजी व उपचार न झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. यासाठी पालकांनी फेविक्विक, स्टिकफास्ट, अँसिड, चुना, पेट्रोल, मिरची, अल्कली यासारख्या पदार्थांपासून मुलांना दूरच ठेवले पाहिजे किंवा ते हाताळताना स्वत: तेथे हजर राहिले पाहिजे. एवढे करूनही असा पदार्थ डोळ्यात गेल्यास घाबरून न जाता डोळ्यांवर पाणी मारत राहावे. डोळ्यातील पदार्थ प्राथमिक स्वरूपात जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत हे करत राहावे. त्यानंतर शक्य तितक्या लवकर रुग्णालयात जावे. तोपर्यंत कॉटनचा ओला कपडा डोळ्याला लावून धरावा. - डॉ. संतोष काळे, नेत्रशल्यचिकित्सक, ऑप्टेक रुग्णालय


पायाखालची जमीनच सरकली
मितालीच्या आईने जोराने मला आवाज दिला. मुलीच्या डोळ्यात स्टिकफास्ट गेल्याचे म्हणाली. हे कळताच पायाखालची जमीन सरकली. मुलीचा डोळा जाईल का, ऑपरेशन, उद्याच्या पेपरचे काय, तिच्या असंख्य होणार्‍या वेदनांचे काय करू, असे अनेक प्रश्न एकाच वेळा डोक्यात घोंगावत होते. मुलीचे नशीब आणि डॉक्टरांच्या अथक प्रयत्नामुळे मुलीचे आयुष्य वाचले. पालकांनी आपल्या पाल्याकडे काळजीने लक्ष देण्याची गरज आहे.
राजेंद्र खटावकर,विद्यार्थिनीचे वडील


टेन्शन डोळ्याचे अन् परीक्षेचेही..
छोट्याशा चुकीमुळे ही घटना घडली. प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्या. डोळ्याची तर चिंता होतीच, पण दुसरीकडे परीक्षेचीही होती. या प्रकारातून एवढेच सांगावे वाटते की, आपण आपल्या लहान मुलांच्या हातात अशा वस्तू देऊ नयेत, मोठय़ांनी याबाबत जास्त काळजी घेतली पाहिजे. कारण या छोट्या गोष्टीमुळे आयुष्यच उद्ध्वस्त होऊ शकते. मी स्वत: याचा जिवंत अनुभव घेतला. इतरांनी ‘बी केअरफुल’.
मिताली खटावकर, विद्यार्थिनी