आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Congress Candidature

नो पॉलिटिक्स प्लीज, आधी सभा, नंतर उमेदवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - काँग्रेसचा उमेदवार ठरवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री बाळासाहेब थोरात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले म्हणून सकाळी 9 वाजेपासूनच सुभेदारी विश्रामगृहावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली. मात्र पालकमंत्री आले, त्यांनी मैदानांची पाहणी केली आणि सुभेदारीवर येताच ‘नो पॉलिटिक्स प्लीज, आज फक्त सभेवरच चर्चा होणार, उमेदवाराचे नंतर बघू’ म्हणत पुन्हा विमानतळाकडे पाय वळवले. त्यामुळे सर्वांचाच हिरमोड झाला.


राहुल गांधींच्या सभेसाठी मैदानाची पाहणी करण्यासाठी थोरात शहरात आले. मात्र, उमेदवारीबाबत चर्चेसाठी हा दौरा असल्याचा संदेश सोमवारी रात्री कार्यकर्त्यांत पसरला. सकाळी नऊ वाजता थोरात येणार असल्यामुळे त्याआधीच कार्यकर्ते सुभेदारीवर जमले. सुभेदारीच्या हिरवळीवर मंडपही उभारण्यात आल्याने येथेच चर्चा होणार असे वाटले. पण थोरात साडेअकरा वाजता सुभेदारीवर आले आणि फक्त सभेविषयी बोलले.


उड्डाण लांबले : थोरात साडेबारा वाजता मुंबईकडे जाणार होते; परंतु आधी 2 वाजेची वेळ सांगितल्याने विमानतळावरील अधिकारी टॉवरला कुलूप लावून गायब झाले. साडेबारा वाजता खासगी हेलिकॉप्टरचे उड्डाण ठरल्यामुळे वरिष्ठ पातळीवरून त्याचा शोध घेतला. अधिकारी साडेबाराच्या सुमारास सापडला अन् एक वाजता हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले.


पक्षीय दौरा, पण यंत्रणेचा वापर : थोरात यांचा दौरा हा पूर्णपणे पक्षासाठी होता. मात्र, तरीही यासाठी यंत्रणेचा वापर झाला. उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांपासून महसूल विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. सुभेदारीवर झालेला खर्चही महसूल विभागाच्या खात्यावर टाकला जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. मात्र, त्याबाबत सायंकाळपर्यंत निश्चित झाले नव्हते.


यापुढे काळजी घेऊ
शनिवारच्या हाणामारीबाबत थोरात यांना विचारले असता ते म्हणाले, सध्या काँग्रेसमध्ये अतिउत्साह आहे. त्याचाच हा परिणाम. हा उत्साह आता निवडणुकीत वापरण्याची गरज आहे. झाला प्रकार चुकीचाच होता. यापुढे काळजी घेऊ. कोणीही वरिष्ठांकडे तक्रार केलेली नाही. मात्र, चूक करणार्‍यांवर कारवाई होईल.